रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोटखराब जमिनी विम्यासाठी संरक्षीत करा

खा.नारायण राणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मांडल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या

कृषीमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे दिले आश्वासन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर. डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा यात समावेश आहे. अरबी समुद्र ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अरुंद पट्टीवर तयार झालेला भुभाग आहे. डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहेत.अशा खडकाळ जमिनीवर या बागायती पिकांची मोठ्या कष्टाने शेतकरी,बागायतदार लागवड करत असतात.दरम्यान पीक विमा कंपन्यांनी या वर्षापासून पोट खराब जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामूळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पोटखराब जमिनीचा (खडकाळ आणि कोरडा भाग) विमा क्षेत्रात समावेश करावा.यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे खा.नारायण राणे यांनी केली आहे. त्यांची भेट घेत कोकणातील शेतकरी,बागायतदारांच्या समस्या खा.नारायण राणे यांनी मांडल्या.यावेळी निवेदनही कृषीमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान आपण कोकणातील शेतकऱ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे अभिवचन कृषी मंत्र्यांनी दिले.
कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. नारायण राणे यांनी शेतकऱ्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणतात,माझा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा पश्चिम घाट परिसराचा एक भाग आहे. पश्चिम घाटात डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील ४० कि.मी.रुंदीच्या अरुंद पट्टीवर तयार झाले आहेत. या दोन जिल्ह्यांतील मुख्य पिके म्हणजे आंबा, नारळ, सुपारी ,काजू आणि इतर फलोत्पादन उत्पादने. डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहे आणि अशा खडकाळ जमिनीवर या बागायती पिकांची अत्यंत कष्ट घेत लागवड केली जाते.
राज्य सरकारच्या महसूल विभागात या खडकाळ जमिनींचे वर्गीकरण प्रामुख्याने पोट खराबा म्हणजे खडकाळ आणि शेती अयोग्य जमीन असे केले जाते. लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे ही खडकाळ जमीन किंवा पोट खराबा फलोत्पादनासाठी अतिशय उपयुक्त आहे. या जमिनींवर पिकणाऱ्या फळांना मोठी मागणी असते. दुर्दैवाने, पीक विमा कंपन्यांनी या वर्षापासून पोट खराब जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे वरील दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही कृपया या प्रकरणाकडे लक्ष द्या आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील फळबाग लागवडीतील सर्व पोटखराबा जमिनीचा पीक विम्यात समावेश करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या या जिल्ह्यांची आर्थिक दुरवस्था यामुळे दूर होईल.अशी भुमिका खा.नारायण राणे यांनी मांडली.याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!