खारेपाटण हायस्कुल येथे स्वरपौर्णिमा साजरी

पहिली ते दहावी पाठयक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता अभिवाचन व एकपात्री अभिनयाच्या पंचसूत्री कार्यक्रम करणारी एकमेव शाळा

खारेपाटण येथील शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण येथील सभागृहात स्वरपौर्णिमा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. 10जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निम्मित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते दहावी पाठयक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता अभिवाचन व एकपात्री अभिनयाच्या पंचसूत्री कार्यक्रम करणारी ही एकमेव शाळा आहे. या कार्यक्रमात पहिली ते दहावी पाठयक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता अभिवाचन व एकपात्री अभिनय विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट रित्या सादर केले. या स्वरपौर्णिमा कार्यक्रमात 75विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यक्रमातील मराठी आणि हिंदी विषयांच्या कवितांवर आधारित गायन, नृत्य, कविता अभिवाचन आणि एकपात्री अभिनय असा पंचसूत्री कलाविष्कार यांचा संगम असलेला एक सुंदर आणि भावस्पर्शी कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री. संदिप पेंडूरकर यांची नाविन्यपूर्ण संकल्पना व दर्जेदार संगीत संयोजन यामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागले.
आपण ज्या व्यक्तीमुळे घडतो, शिकतो, विचार करतो, अशा महान व्यक्तिमत्त्वांप्रती आपल्या अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! हा दिवस म्हणजे श्रद्धेचा, संस्कारांचा आणि ज्ञानाचा उत्सव.
गुरू – हा शब्द लहान वाटतो, पण अर्थ मात्र असीम! “गु” म्हणजे अंधार आणि “रु” म्हणजे प्रकाश –
जो अंधार दूर करून जीवनात प्रकाश पेरतो, तोच खरा गुरु…गुरु म्हणजे दिशा दाखवणारा वाटसरू,
गुरु म्हणजे वाणीने प्रेरणा देणारा ज्ञानदीप,
गुरु म्हणजे संकटात आधार देणारा उभा कणा. अशा सुंदर शब्दांमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून कु.प्राजक्ता ठाकूर देसाई हिने या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय ओघवत्या शब्दांमध्ये केली व गुरुमहिमा व्यक्त करणारे सुंदर नृत्य इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आयुषी गुरव,दिबा ठाकूर, दिक्षा कर्ले व आराध्य पराडकर यांनी सादर केले. त्यानंतर इयत्ता दहावीची धरिला पंढरीचा चोर ही कविता आहे त्या विठोबासाठी… त्या पांडुरंगासाठी… जो भक्तांच्या प्रेमात इतका रंगून गेला की पंढरपूरचा चोरच बनला!
हा चोर दागिने चोरणारा नाही… तो आहे भक्तांच्या ह्रदयाचा चोर!
तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई यांचं प्रेम चोरून तो त्यांच्या ह्रदयातच वसला.अशा आशयाची कविता आणि गाण्यातून विठोबाशी असलेलं नातं, त्याचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि भक्तीची गोडी तेजल ठाकूरदेसाई हिने व्यक्त केली.
त्यानंतर एका बालकाच्या मनातील प्रांजळ इच्छा “देवा मला शाळेत जायचं हाय” हे नृत्य तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. छोट्याशा जीवाला शाळेत जायचंय, पुस्तकं वाचायची आहेत,
शिकून मोठं व्हायचंय, स्वतःचं जीवन घडवायचं आहे. हा केवळ नृत्यप्रयोग नाही, तर त्या लाखो मुलांचं प्रतिनिधित्व आहे ज्यांना शिक्षणाची आस आहे.शाळा म्हणजे त्यांच्या स्वप्नांची सुरुवात, उज्ज्वल भविष्यासाठीची वाटचाल. आठवीची भावस्पर्शी हिंदी कविता छुप छुप अश्रू बहानेवालो प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने मार्दव आवाजामध्ये सदर केली. एक सशक्त संदेश देणारी प्रेरणादायी साद. दु:ख हे प्रत्येकाच्या जीवनात असतं, पण त्या दु:खावर रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करणं गरजेचं आहे.अश्रू हे मोत्यांसारखे मौल्यवान असतात ते फुकट लुटवू नयेत,असा भाव व्यक्त झाला .यानंतर बालकवींची श्रावणमासाचे महत्त्व विषद करणारी श्रावण मासी हर्ष मानसी हि प्रसिद्ध कविता आयुषी गुरव हिने पाठांतर व अभिनययुक्त सादर करून रसिकांची मने जिंकली. मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती आपल्या ओठांवरची गोड कविता आहे, आपल्या मनातली गोड भावना आहे. ही आपली मायभाषा आहे. आपल्या संस्कृतीची ओळख, आपल्याला जपणारी माऊली! पाचवीच्या अभ्यासक्रमातील “माय मराठी” ही कविता आपल्या मातृभाषेवरचं प्रेम, आपुलकी आणि अभिमान व्यक्त करते. या कवितेतील प्रत्येक ओळ मराठी भाषेच्या सौंदर्याचं गाणं गाते ही भावना पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून व्यक्त केली. “माय” एक शब्द, पण त्यामागे असतो प्रेमाचा महासागर… माय म्हणजे माया, माय म्हणजे निस्वार्थ सेवा, माय म्हणजे श्रद्धेचा गंध. पुढील सादर झालेली कविता होती मायेच्या, प्रेमाच्या आणि त्यागाच्या अनमोल भावनेची.
“हंबरून वसारले चाटती जव्हा गाय…” या ओळींमध्ये मातेचं वात्सल्य प्रकट होतं.
गाईच्या रूपातून कवयित्रीने मायेसारखं प्रेम दाखवलं आहे. जीवाभावाच्या लेकरासाठी तिचं काळीज तळमळतं. मायेचा असा अनोखा आविष्कार शब्दांमधून उलगडतो.
ही कविता फक्त गाईची नाही, ती मातेच्या प्रत्येक रूपाची ओळख करून देते.
कधी तिचं दुःख, कधी तिचं हसू … अशी भावनांचा परिपोष असलेली कविता गायनामधून इयत्ता सहावीच्या मुलींनी सदर करून वातावरणामध्ये वात्सल्य गंध पसरविला. संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांनी गझल च्या लहेज्यामध्ये संगीतबद्ध केलेली व स्वतः गायन केलेली आठवी हिंदी पुस्तकातील “चारू चंद्र की चंचल किरणें, खेल रही हैं जल थाल में…” या कवितेने कार्यक्रमाची उंची वाढविली. चंद्रप्रकाशाच्या सौंदर्याची आणि निसर्गातील रम्य दृश्यांचं मनोहरण करणाऱ्या चित्रांची,
जणू चंद्राची चंचल किरणे जलाशयात खेळत आहेत, पाण्यावर उठणाऱ्या लहरींमध्ये तेजाची नाजूक लहर आहे अश्या अर्थाची ही कविता रसिकांना चिंब भिजवून गेली. प्रशालेचा सातवीतील विद्यार्थी गुरुप्रसाद सुतार याने पखवाज वादन सादर करून संगीत विभागाची शान वाढविली. प्राथमिक विभागातील पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी चिऊताई चिऊताई या बालकवितेवर मनमोहक नृत्य सादर केले. पाणी – आपल्याला आयुष्य देणारा अमूल्य स्रोत. पण आपण त्याची किंमत ओळखतो का?
पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे, जीवनदायी आहे, आणि त्याचं जतन करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेला हाक देणारी सातवी मराठी विषयाची भावोत्कट कविता दिबा ठाकूर हिने सादर केली. या कवितेतील “थेंब” फक्त पाण्याचा थेंब नाही – तो आहे शहाणपणाचा, जाणिवेचा, आणि जबाबदारीचा.
कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याची, आणि एका नवविवाहितेच्या माहेरवाटेच्या ओढीची दहावी मराठी विषयाची भावस्पर्शी कविता अनुक्षा पतयाण हिने सादर करून माहेरवाशिणीच्या आठवणी जागविल्या.
गोमू – म्हणजे आपल्या घराघरातली लेक – माहेरच्या आठवणीत हरवलेली. कोकणातलं निसर्गसौंदर्य, ताजं पाणी, हिरवाई, सागरकिनारा सगळं काही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहतं. ती नाखव्याला विनवते की “माझ्या घोवाला कोकण दाखवा!” कारण कोकण तिच्या आठवणींमध्ये नाही, तर तिच्या श्वासात आहे.
ही कविता केवळ निसर्गाचं वर्णन नाही, तर ती आहे माहेरच्या ओढीची आणि ममतेच्या नात्यांची गोड गाथा.आईच्या पदरासारखा कोकणाचा समुद्र तिच्यासाठी शांततादायक आहे. ही कविता आपल्या साऱ्यांनाच आपल्या मुळांशी जोडते. ती आहे आठवणींची, नात्यांची, आणि त्या निरागस कोकणी प्रेमाची.
‘तू झालास मूक समाजाचा नायक ‘ या दहावी मराठी च्या कवितेवर प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने केलेल्या एकपात्री अभिनयाने रसिकांना अंतर्मुख केले. ज्यांनी मूक आणि शोषित समाजाला शब्द दिले, आत्मभान दिले, आणि न्याय मिळवून दिला.ज्यांच्या जीवनात होते अपमान, उपेक्षा, अडथळे पण तरीही त्यांनी हातात घेतलं शिक्षणाचं अस्त्र, आणि उभारली नव्या भारताची दिशा त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे संघर्षांची शिदोरी, विचारांची धार आणि परिवर्तनाची मशाल. ही कविता त्यांच्या त्याच लढ्याची साक्ष देते.
स्वप्नांसाठी , धेय्यांसाठी पाखराला आकाशात उंच झेप घ्यायची असते. प्रत्येक संकटावर मात करत, उंच भरारी घेण्याचं आवाहन करणारी दहावी मराठी विषयातील ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या कवितेतून आपल्याला मिळतो आत्मविश्वास, आशा आणि नवचैतन्याचा संदेश. लहानशा पंखांत मोठी ताकद असते, हे ती पाखराच्या प्रतीमेतून सांगते.सानिया पवार हिच्या गोड आवाजाने या कवितेचा भावार्थ रसिकांपर्यंत पोहोचला.
भारत म्हणजे विविधतेत एकता, समृध्द संस्कृती आणि वीरांची भूमी. आपल्या मातृभूमीला नमन करणारी, निरपेक्ष भावनेने देश सेवा करण्याची शिकवण देणारी दहावी मराठी पुस्तकातील “जय जय भारत देशा” ही कविता देशाच्या शौर्याची, परंपरेची आणि महानतेची आठवण करून देते. या कवितेवर राधा ठाकूरदेसाई हिने देशभक्तीने ओतप्रोत भरलेले नृत्य सादर केले. याच भावनेवर आधारित “अनामवीरा इथे जाहला तुझा जीवनांत” हे गीत प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने सादर करून देशाच्या सैनिकांना मानवंदना दिली. प्रशालेचे शिक्षक श्री. लक्ष्मीकांत हरयाण सर यांनी एक सुमधुर गीत गायन केले. कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांनी सहावीतील मराठी कविता ”बलसागर भारत होवो” ही भैरवी रागामध्ये गायन करून केली.
या कार्यक्रमास श्रीधर पाचंगे, मंथन चव्हाण, आयुष मांगले, लक्ष्मीकांत हरयाण सर यांनी केली. पूनम गुरव, शार्मीन काझी व प्राथमिक विभागातील शिक्षिकांचे नृत्य दिग्दर्शन लाभले.संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि खारेपाटण पंचक्रोशीतील रसिकांनी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे खूप कौतुक केले व सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.
पाठ्यपुस्तकातील कवितांवर आधारित अश्याप्रकारचा संगीतमय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाल्याने सर्वांनी कार्यक्रमाची वाहवा केली ..संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेच्या दहावीतील विद्यार्थिनी श्रुती जामसांडेकर, संस्कृती निगरे, प्राजक्ता ठाकूरदेसाई व संस्कृती भोर यांनी ओघवत्या शैलीमध्ये केले…

error: Content is protected !!