सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका
सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला! या सिंधुदुर्गच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खा. नारायण राणे यांनी घेतली आहे. केंद्रीय संस्कृती अन पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेत खा.नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तव स्थितीचे अन ऐतिहासीक दस्तावेजाच्या अमुल्य ठेव्याकडे लक्ष वेधले. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी उपाययोजना करण्याबाबत पर्यटनमंत्र्यांनी आश्वासीत केले.
यावेळी खा.नारायण राणे यांनी पर्यटनमंत्र्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आवडते पर्यटन स्थळ आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला दरवर्षी ५ ते ६ लाख पर्यटक भेट देतात. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी प्रत्यक्ष गडाला भेट दिली होती. त्यांना समर्पित या किल्ल्यावर मंदिर असून गडाच्या तटबंदी नजीक छत्रपतींचा हात अन पायाचा ठसाही जतन केला गेला आहे.
दुर्दैवाने, योग्य देखरेखीअभावी आज हा किल्ला अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. संरक्षण भिंती जलद गतीने ढासळत आहेत.अनेक ठिकाणी तटबंदीला भगदाड पडले आहे. रोषणाई अभावी सायंकाळनंतर पर्यटकांची ये-जा थांबते. किल्ल्याच्या तटबंदीला संरक्षीत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई केल्यास पर्यटकांची संख्या येथे वाढेल. तसेच पुढील पडझड थांबवण्यासाठी टेट्रा पॉड्स समुद्रात फोर्डच्या आसपास ठेवणे आवश्यक आहेत.किल्ल्याच्या संरक्षण भिंतींची पडझड रोखण्यासाठी पावले उचलण्याची आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर रोषणाई करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात अशी विनंती केंद्रीय पर्यटनमंत्री शेखावत यांच्याकडे खा.नारायण राणे यांनी केली आहे.