सत्ताधारी राणे कुटुंबाच्या दबावामुळे प्रिया चव्हाण न्यायापासून वंचीत

अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पोलिसांकडून आरोपींना तुरुंगाऐवजी रुग्णालयाची वारी
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का?; माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल
सावंतवाडी- माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी सत्ताधारी राणे कुटूंबाचा पोलिसांवर दबाव आहे. घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी भाजप पक्षाच्या देवगड माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती-मिलिंद माने, मुलगा -आर्य माने यांना वेळीच अटक न केल्यामुळे त्यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संधी देण्यात आली. त्या कालावधीत प्रणाली माने आणि आर्य माने यांनी अटकपूर्व जामीनही मिळविला. मात्र हे प्रकरण चिघळल्याने मिलिंद माने याच्यावर गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले परंतु पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून अटकेची कारवाई करण्याऐवजी रुग्णालयात नेण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवा चांगल्या नसतानाही मिलिंद माने यांना हिवतापाची लागण झाल्याचा रिपोर्टहि अवघ्या १० मिनिटात देण्यात आला. या दरम्यान रुग्णालयाचा आसरा घेत मिलिंद माने यांनीही न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविला. पोलिसांनी न्यायालयाकडे योग्य भूमिका न मांडल्यामुळेच आज गुन्हा दाखल असलेले आरोपी अटकेपासून मोकाट आहेत. त्यामुळे हे सर्व पूर्वनियोजित असल्याप्रमाणेच घडले आहे. यातून भाजप पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्ताधारी राणे कुटुंबाचा पोलिसांवर दबाव आहे हे प्रकर्षाने दिसून येते. राणे कुटुंबाच्या दबावामुळे पीडित प्रिया चव्हाण आणि कुटुंबीय न्यायापासून वंचीत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.