ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

कनेडी गट शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच नोकरी मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी कौशल्य विकासाचे धडे प्रत्येक शाळेमध्ये दिले जातील असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे बोलताना केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चा ७१ वा वर्धापन दिनाचे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संचालक संदेश सावंत, माजी अध्यक्षा संजना सावंत, संस्थेचे सेक्रेटरी शिवाजी सावंत, संचालक डॉ. प्रदीप सावंत, खजिनदार प्रकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतेही राजकारण आपण खपून घेणार नाही. कारण विद्यार्थी हा जिल्ह्याच्या विकासाचा पाया आहे. येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्या नोकऱ्यांच्या अनुषंगाने राज्य शासन आयटीआय मध्ये विशेष कौशल्याचे उपक्रम राबवत आहे. याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये कौशल्य विकासाचे धडे देणे ही आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारली आहे. त्यामुळे कनेडी गट शिक्षण संस्थेच्या दर्जेदार सभागृहासाठी २५ लाखाचा निधीही आपण दिला असून या संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेले शालेय शिक्षण हे निश्चित दर्जेदार आहे. या संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून माझी फार अपेक्षा आहे. शाळांमध्ये सुद्धा आता एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्याला भविष्याच्या वाटचालीकडे सक्षम बनवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्ह्याचा विकास गतीने होत आहेत. विविध विकासाची कामे सुरू आहेत. कोकणासाठी सर्वात मोठे वाडवण बंदर होत आहे. या बंदराच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील. त्या आपल्या स्थानिकांना मिळाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. संस्थेने मागील ७१ वर्षात जे कार्य केले तो मोठा वाटा शिक्षण क्षेत्रात आहे.
सतीश सावंत म्हणाले, कनेडी गट शिक्षण संस्थेने अनेक उपक्रम राबवले म्हणूनच संस्थेला जिल्ह्यात माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पहिला क्रमांक मिळाला. अनेक उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे ही आम्ही देत आहोत. ग्रामीण भागातील संस्थांकडे अनेक समस्या आहेत. विशेष म्हणजे शिक्षक भरती ही कोकण विभागात झाली पाहिजे. यासाठी पालकमंत्री राणे यांनी प्रयत्न करावेत. संस्थांना अनुदान मिळत नाहीत. त्याबाबतही प्रयत्न करावेत. सध्या जी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती सुरू आहे. यामुळे संपूर्ण राज्यातून शिक्षक यात संधी घेतात. त्यामुळे पर जिल्ह्यातील उमेदवाराला स्थानिक भाषेतून विद्यार्थ्यांना समजून देणे फार अवघड जाते. त्यामुळे स्थानिक उमेदवार जर शिक्षक म्हणून मिळाले तर संस्थांना फायदा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली .
संदेश सावंत म्हणाले, या संस्थेला खासदार नारायण राणे यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. राणेंच्या सहकार्यातूनच ही संस्था यशाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे राणेंचा या संस्थेवर मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.
यावेळी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. तसेच विविध क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. तसेच उत्कृष्ट शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसूरकर तर आभार प्रभाकर सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!