आता अनुभवायला मिळणार ‘न पाहिलेले कोकण’ !

अभिनेते दिगंबर नाईक आणि प्लॅनेट मराठी यांचा सहभाग

निलेश जोशी । कुडाळ : कोकण… त्यात करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग संपन्नता, लोककला, खाद्यसंस्कृती, गड किल्ले यांची समृद्धता लाभली आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या आहेत. पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. हे ‘न पाहिलेले कोकण’ आता जगभरातल्या लोकांना पाहता येणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ या प्रसीद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम लवकरच सुरु होत असून यामध्ये सुप्रसिद्ध मालवणी अभिनेते दिगंबर नाईक आणि सुप्रसिद्ध अँकर जयंती वाघधरे आतापर्यंत न पाहिलेले कोकण आणि त्याचे अंतरंग आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. कुडाळ येथील बनी नाडकर्णी यांचे या कार्यक्रमासाठी मोठ सहकार्य लाभत आहे. आंबेडपाल येथे या कार्यक्रमादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयी माहिती देण्यात आली.


आंबडपालचे माजी सरपंच संतोष सावंत यांच्या घरी या कार्यक्रमाच्या एका भागाचे चित्रीकरण सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी भजनी परंपरा आहे. त्यात करून महिलांचे भजन हा एक वेगळा विषय आहे. त्याचे चित्रीकरण संतोष सावंत यांच्या घरी झाले. त्यावेळी अभिनेते दिगंबर नाईक, प्लॅनेट मराठीच्या अँकर जयंती वाघधरे, बनी नाडकर्णी, डीओपी अजित रेडेकर, अश्विनी कांबळे उपस्थित होते.
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम होणार असून त्या मध्ये कोकणातील आतापर्यंत न पाहिलेली पर्यटन स्थळे, लोककला, लोकपरंपरा, खाद्यसंस्कृती, गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू दाखवण्यात येणार असल्याचे मालवणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी सांगितले. ‘कधीही न पाहिलेले कोकण’ या शीर्षकाखाली हा कार्यक्रम लोकांसमोर येणार असल्याचे बनी नाडकर्णी म्हणाले. कोकणात बरेच पाहण्यासारखे आहे. ते दिगंबर नाईक आणि प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून जगभरातील लोकांपर्यंत आम्ही नक्की पोहचवू आणि ते लोकांना नक्की आवडेल असा विश्वास बनी नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे अँकरिंग प्लॅनेट मराठीची अँकर जयंती वाघधरे करत आहे. कोकण किंबहुना सिंधुदुर्ग जिल्हा खूप सुंदर असून प्लॅनेट मराठी या जगभरातील मराठी लोकांसाठी असलेल्या मोठ्या प्लॅटफॉर्मद्वारे लाखो दर्शकांपर्यंत येथील गोष्टी पोहोचतील असे जयंती वाघमारे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुप्रसिद्ध डीओपी अजित रेडेकर आणि त्यांची टीम करत आहे. कोकण मुळातच खूप सुंदर आहे. येथे चित्रीकरण करताना खूप मजा येते आनंद मिळतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तो आनंद घेत आहे, असे अजित रेडेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संपूर्ण टीम तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. येथील विविध गोष्टी चित्रीकरणासाठी यांनी सुरुवात केली आहे. यावेळी महिला भजनाचे चित्रीकरण करण्यात आले. प्लॅनेट मराठीच्या या टीम मध्ये अँकर जयंती वाघधरे, डीओपी अजित रेडेकर, सहाय्यक कॅमेरामन गेणेश धुंदाळे, जयेश काळसेकर, प्रमोद पाटील, ओम कुडतरकर, रंगभूषाकार स्वप्नील नेमण, अश्विनी कांबळे यांचा समावेश आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!