जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत कणकवलीचे हेमंत पाटकर प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत कणकवलीच्या हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कै. गंगाराम गवाणकर यांच्या कोणत्याही साहित्य कृती वर आधारित या वाचक स्पर्धेत जिल्हाभरातून एकूण दहा स्पर्धक सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धा राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालयात संपन्न झाली. स्पर्धेचा विषय होता कै. गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्य कृती. या स्पर्धेत कै. विजया वामन पाटणकर वाचनालय, कुडाळ नगर वाचनालय, कणकवली, उमाबाई बर्वे ग्रंथालय, देवगड नगर वाचन मंदिर, मालवण नगर वाचनालय वेंगुर्ला, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या तालुका ग्रंथालयानी घेतलेल्या तालुका स्तरीय वाचक स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष धाकू तानावडे. कार्यवाह राजन पांचाळ, सह कार्यवाह महेश बोवलेकर, विभाग संघ सदस्य सतिश गावडे, संघाचे सदस्य जयेंद्र तळेकर, संजय शिंदे, जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, कार्य. सदस्य विजय भोगटे, परिक्षक सौ. डॉ. दीपाली काजरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या वेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष धाकु तानावडे यांनी संगितले की, आपल्या जिल्ह्यातील लेखकाचा परिचय वाचकांना व्हावा, या निमित्ताने वाचन चळवळ वाढावी असा जिल्हा ग्रंथालय संघाचा प्रयत्न आहे. दर वर्षी एक लेखक निवडून ही स्पर्धा घेतली जाते. या वर्षी मालवणी भाषा आपल्या साहित्य लेखनातून परदेशात पोहचविले असे कै. गंगाराम गवाणकर या लेखकाची संघाने निवड केली. ही स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. या स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
या स्पर्धेत एकूण १० स्पर्धक उपस्थित होते. या मध्ये प्रथम हेमंत पाटकर, कणकवली, दुसरा क्रमांक प्रसाद विश्वनाथ खडपकर, वेंगुर्ला, तिसरा क्रमांक सौ. प्रज्ञा नारायण चव्हाण, देवगड, चौथा क्रमांक सौ. विशाखा विलास वेंगुर्लेकर, वेंगुर्ला, पाचवा क्रमांक सौ. सानोली सचिन गोडे, कुडाळ यांना मिळाला. विजेत्यांना रोख परितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक राजन पांचाळ यांनी तर आभार महेश बोवलेकर यांनी यांनी मानले.





