48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा 23 ते 27 डिसेंबर रोजी

सायंकाळी 7 वाजल्यापासून रंगणार पाच दिवसांचा एकांकिका उत्सव

कोकणातील नाट्यचळवळीचा समृद्ध वारसा पुढे नेणारी आणि नाट्यरसिकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेली 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. गेल्या 47 वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेने मराठी नाट्यसृष्टीला अनेक दर्जेदार कलाकार, लेखक व दिग्दर्शक दिले असून नाट्यसंवर्धनात तिचे मोलाचे योगदान आहे.

नाथ पै यांच्या प्रगल्भ विचारांना आणि सामाजिक जाणिवेला अभिवादन म्हणून सुरू झालेल्या या स्पर्धेचा प्रवास गौरवशाली राहिला आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच नाट्यप्रयोगशीलतेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धेतून घडत आलं आहे.

यावर्षीच्या स्पर्धेला राज्याच्या विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चिपळूण, सांगली, कोल्हापूर, मुंबई, कल्याण आणि सिंधुदुर्ग येथून एकूण 26 संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये खुल्या गटातील 11 आणि शालेय गटातील 15 अशा एकूण 26 एकांकिकांचा समावेश आहे. विषय, आशय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने यावर्षीची स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

दि. 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी 7 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून नाट्यरसिकांना दररोज दर्जेदार एकांकिकांचा आस्वाद घेता येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मान्यवर परीक्षकांच्या शुभहस्ते होणार आहे.

या पाच दिवसांच्या नाट्योत्सवासाठी एकत्रित प्रवेशिका रुपये 500 तसेच 300 रुपयांची प्रवेशिका उपलब्ध असून त्यांची विक्री सध्या सुरू आहे.

नाट्यकलेचा उत्सव असलेल्या या स्पर्धेला यावर्षीही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह व कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

error: Content is protected !!