तेलंगण येथील भारतीय कला महोत्सवात डॉ. निर्मोही फडके यांचा सहभाग

स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण
साहित्य अकादमी, दिल्ली आणि संस्कृती मंत्रालय मध्यदक्षिणी सांस्कृतिक केंद्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणातील राष्ट्रपती भवन येथे आयोजित केल्या गेलेल्या 'भारतीय कला महोत्सवसाठी मूळ कोकणातील आणि सध्या ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉ. निर्मोही फडके यांना स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रित केले गेले. भारतीय पातळीवरच्या अशा बहुभाषी महोत्सवासाठी निमंत्रित केल्या गेलेल्या कोकणातील त्या पहिल्याच लेखिका असून त्यांच्या या निवडीबद्दल कोकणच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
'राष्ट्रपती निलयम' ह्या ऐतिहासिक स्थानाच्या अवाढव्य परिसरात साजऱ्या झालेल्या ह्या भव्य कला महोत्सवाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते झाले. हिंदीमध्ये झालेल्या ह्या चर्चासत्रात मराठी भाषेतून डॉ. निर्मोही फडके तर त्यांच्यासह गोव्याच्या अन्वेषा सिंगबल (मडगाव) ह्या कोंकणी साहित्यावर आणि गुजरातच्या नियती अंतानी (अहमदाबाद) ह्या गुजराती साहित्यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित होत्या. डॉ. निर्मोही फडके ह्यांनी मराठी साहित्यातील स्त्री-साहित्याची परंपरा, त्यातून दिसून येणारा स्वत्वाचा सशक्त आवाज आणि माणुसकीचे, जीवनाचे भान ह्याबद्दल विचार मांडले.
यावेळी बोलताना डॉ. फडके म्हणाल्या 'महिला सशक्तीकरण' ही संकल्पनाही माहीत नसण्याच्या काळात मराठी स्त्रियांनी बोलींतील आपल्या मौखिक कथा - काव्यांमधून आपल्या मनाचे, विचारांचे सशक्तीकरण सिद्ध केले होते. महदंबेच्या 'धवळ्यां' पासून स्त्री-संतसाहित्यापर्यंतचा हा सशक्त प्रवास आहे. गेल्या दीड शतकांपासून मराठी स्त्री लिखित साहित्याचे स्त्री सशक्तीकरणाच्या मुख्य प्रवाहातील योगदान लक्षणीय आहे. ताराबाई शिंदे ह्यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' निबंधाने नव्या युगात बीज रोवले. पुढे ते बहरले. तसेच गेल्या काही दशकांत मराठी साहित्यात स्त्रिया समीक्षात्मक लेखन, वैचारिक लेखन, आत्मकथने, अनुवाद, बालसाहित्य, शैक्षणिक विषयांशी संबंधित लेखन, वैज्ञानिक साहित्य, नाट्यसंहिता, चित्रपट कथा-पटकथा, वेब सिरीज, माध्यमांतून सादर होणाऱ्या मालिका, तांत्रिक लेखन, जाहिरात लेखन, ब्लाॅग लेखन इत्यादी विविध प्रकारे लिहीत आहेत. व्यक्त होत आहेत. स्त्रियांचे सशक्तीकरण समजून घेतलेले पुरुषही वेगळ्या प्रकारे लिहीत आहेत. आज आपले जगण्याचे विचार हे लिंगभेदापलीकडे जाऊ पाहात आहेत. स्त्री-पुरुष फरकाच्या तसेच आज आपण ज्यांना एलजीबीटिक्यू ह्या रकान्यात मोजतो, त्याही पलीकडे जीवन आहे. आज केवळ भारताच्या पश्चिमेकडील साहित्यच नव्हे, तर एकूणच सर्व दिशांतून निर्माण होणारे भारतीय साहित्य ह्या जीवनाला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे. एक नवी जीवनदृष्टी घेऊन, रुजवून भारतीय लेखक लिहीत आहेत. कलाकार कला सादर करत आहेत. सशक्तीकरणाची नवी व्याख्या नव्या तंत्रमंत्राने साहित्यात घडवली जात आहे. आपण सर्व संवेदनशील, सर्जनशील साहित्य-कला-प्रेमी त्यामध्ये आपल्या परीने योगदान देऊ या. जुन्या-नव्याचा मेळ राखत साहित्यकला अधिक सशक्त करू या.





