कुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कुडाळ : कुडाळ मधली कुंभारवाडी येथील घरात गौरव रामचंद्र कदम (वय २२, मूळ रा. नेरूर – पंचशील नगर, सध्या रा. कुडाळ – कुंभारवाडी) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल, मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. गौरव सोमवारी मुंबईहून गावी आला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
गौरव व त्याचा भाऊ रुपेश मुंबईला असतात. ते दोघेही भाऊ काल गावी आले होते. नेरूर येथून तो रात्री कुडाळ-कुंभारवाडी येथील घरी झोपायला जातो असे सांगून तो आला होता. मंगळवारी दुपारपर्यंत तो पुन्हा नेरूर येथील घरी गेला नाही. म्हणून त्याचा भाऊ रुपेश त्याच्या कुडाळच्या घरी आला. तेव्हा घराच्या पुढील व मागील दरवाजांना आतून कडी होती. रुपेशने खिडकीतून पाहिले असता गौरव याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. कुडाळ पोलिसांनी याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, हवालदार मंगेश शिंगाडे, होमगार्ड शंकर घाडी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याबाबतची खबर त्याचा भाऊ रुपेश रामचंद्र कदम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ