ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका : डॉ. संजीव आकेरकर

बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका. त्यासाठी माघार घेऊ नका. निराश होऊ नका. सतत प्रयत्न करत रहा. डॉक्टरकीच्या पेशाच्या निमित्ताने मानवसेवेसारखं पवित्र क्षेत्र तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी मिळालेला आहे. तेथे तणामुक्त राहून रुग्णसेवा करा. त्याचबरोबर आपल्यातील कलागुण खिलाडूवृत्तीने जोपासा .आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले. या महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. आकेरकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उमेश गाळवणकर, कुडाळचे तहसीलदार सौ.व श्री अमोल पाठक ,बॅ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला . श्रीवर्धन आरोसकर, महिला महाविद्यालयाचे व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज,बी.ए. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर हे उपस्थित होते.

बॅरिस्टर नाथ पै फिझिओथेरपी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सरस्वती माता व नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. संजीव आकेरकर पुढे म्हणाले,ध्येय प्राप्त करताना प्रतिकूल गोष्टी घडल्या तर निराश न होता त्याला सामोरे जा; नक्कीच संधी मिळेल. प्रयत्न सोडून देऊ नका .यश सोबत येईल; यावेळी सर्वांना विसरलात तरी चालेल पण ज्यांच्यामुळे आज आपण समाजात उभे आहोत ते आई-वडिलांचे ऋण मात्र कधीच विसरू नका, असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक म्हणले, स्नेहसंमेलनातून तुमच्यातील अन्य कलागुण जोपासा. वैद्यकीय पेशामध्ये प्रवेश कराल तेव्हा परोपकाराची साथ सोडू नका. त्यातून मिळणारा आनंद सर्वात मोठा असतो त्यातून अधिक काळ ऊर्जा मिळते. श्री. पाठक यांनी उमेश गाळवणकर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गुणांची मुक्तकंठाने स्तुती केली.

आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना उमेश गाळवणकर म्हणाले, जेव्हा आपण समाजासाठी काम करतो तेव्हा त्यानिमित्ताने परमेश्वर आपल्या मदतीला धावत असतो .कोरोना काळात आमची संस्था आणि नर्सिंगच्या शिक्षक विद्यार्थी कोरोनाग्रस्त लोकांसाठी देवदूत ठरले. आणि जेव्हा आम्ही कोरोनाबाधित झालो तेव्हा डॉ. आकेरकरांसारख्या डॉक्टरांच्या रूपाने आम्हाला देवदूत लाभला. म्हणून आपले सामाजिक कार्य परमेश्वरार्पण करा. तोच आपला पाठीराखा असतो. असे सांगत उपस्थितांना धन्यवाद दिले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फूर्त व मुक्तपणे स्नेहसंमेलनात सहभागी होत आपल्यातील कलागुण सांस्कृतिक कला गुण सादर केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन डॉ सुरज शुक्ला यांनी केले. तर सूत्रसंचालन दिशा कांगडे व मंदार जोशी यांनी केले व उपस्थितांचे आभार डॉ.शरावती शेट्टी यांनी मांनले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!