कुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !
कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘पास’ काढण्यासाठी असलेले काउंटर आवश्यक त्या वेळेत बंद, विद्यार्थ्यांनी नोंदविली तक्रार, स्थानकाला ‘स्थानकप्रमुख’ नाही
कुडाळ : कुडाळ शहरातील गांधी चौकनजीक असलेल्या कुडाळ एसटी स्टॅन्ड नेहमीच या ना त्या चर्चेत असतेच. कधी अनधिकृत पार्किंग, प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे कुडाळ एसटी स्टॅन्डबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यात भर म्हणजे आज सकाळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी देण्यात येणारे ‘पास’ काढावयाचे होते. पण स्टॅन्डमध्ये एसटी प्रसाशनाने सुरु केलेले एसटी पास काउंटर बंद असल्याचे दिसून आले. माडखोल आणि कणकवली येथे जाणारी ही शालेय मुले आज सकाळी ८ वाजल्यापासून रांगेत उभी होती. या मुलांची शाळा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत असते. या मुलांचा १ तास मुळात प्रवासात जातो. त्यामुळे मुळात या मुलांना पासची वेळ जमत नाही. त्यामुळे या शालेय मुलांचे नुकसान होत आहे. याबाबत एसटी प्रशासनाने मुलांची होणारी गैरसोय दूर करणे आवश्यक आहे. याबाबतची तक्रार ख़ुशी सावंत, वनिता शेटये, दीप्ती फाटक, अवनिश भांबुरे, वैष्णवी जाधव, विराज घोगळे, प्रफुल्ल गावडे यांनी नोंद केली आहे.
मुळात सिंधुदुर्ग जिल्हयाचे कुडाळ हे मुख्य केंद्र असून अनेक भागातून या ठिकाणी प्रवासी येत असतात. पण या स्थानकाला स्थानकप्रमुख हा अधिकारी नसून यामुळे प्रवाशांनी कोणाकडे आपल्या तक्रारी मांडाव्यात हा प्रश्न निर्माण होतो. कुडाळ एसटी डेपो येथे अधिकारी वर्ग असताना त्यातील एक अधिकारी स्टॅण्डवर स्थानकप्रमुख म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ