वीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक

वीज प्रश्न सुटले नाहीत तर कायदा हातात घेण्याचा इशारा

महावितरणकडून समस्या दूर करण्याची ग्वाही

प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कुडाळ परिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांतील विज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील वीज प्रश्न त्वरीत दूर करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. जर कार्यवाही झाली नाही तर कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यावर तातडीने समस्या दूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी दिले.
जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमोर संघटनेच्या शिष्टमंडळाने हल्लाबोल करीत, अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्ह्यात गेले काही दिवस वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज विषयक अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ते अद्याप सुटलेले नाहीत. येत्या पंधरा दिवसात ते त्वरीत सोडवावेत. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही, ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी. धोकादायक पोल, वाहिन्या त्वरीत बदलावेत,अशी मागणी करण्यात आली. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले व मालवण या भागातील वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी अधिकारी श्री.वाघमोडे व श्री. पाटील आदी उपस्थित होते.
व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, केशव मुंज, विकास राऊळ, गोविंद सावंत यांच्यासह उपस्थित शिष्टमंडळाने वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंत्यांसोबत चर्चा करीत, या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली. आबा मुंज व सहकाऱ्यांनी आंब्रड येथील वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जर वीज प्रश्न सुटले नाहीत तर कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिला. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी कुडाळ शहरातील वीज प्रश्नांबाबत लक्ष वेधले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!