शिक्षक कपात धोरणाविरोधात वायंगणी ग्रामस्थ आंदोलन छेडणार

वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांची माहिती

मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गंभीर आघात होत असल्याने वायंगणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध नोंदविला असून ग्रामसभेत या धोरणाविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास वायंगणी ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व लाक्षणिक साखळी उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत ग्रामसभेत देण्यात आले. अशी माहिती वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी दिली आहे.

माहिती देताना सरपंच पाटकर म्हणाले की ग्रामसभेतील चर्चेदरम्यान भारताच्या संविधानातील कलम 21-A तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित करण्यात आले. मात्र राज्य शासनामार्फत केवळ विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षक कपात करण्याचे धोरण राबविले जात असून, याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व मराठी माध्यमांच्या शाळांना बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मालवण तालुक्यातील अनेक गावांची लोकसंख्या नैसर्गिकरित्या मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असणे हे प्रशासनिक अपयश नसून भौगोलिक व सामाजिक वास्तव असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत पटसंख्येचा एकमेव निकष लावून शिक्षक कपात केल्यास बहुवर्ग अध्यापन, शैक्षणिक गुणवत्तेतील घसरण, विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक ताण तसेच बालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर प्रत्यक्ष मर्यादा येत असल्याची गंभीर स्थिती निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. शिक्षक कपात म्हणजे ग्रामीण व खेड्यांतील मुलांच्या शिक्षणावर थेट गदा आणण्याचा प्रकार आहे अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामसभेत उमटली. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना धरून तसेच संविधान व RTE कायद्याच्या अनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी शिक्षक कपात धोरणाचा तात्काळ फेरविचार करावा, अशी ठाम मागणी ठरावाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.

याच ग्रामसभेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क प्रभावीपणे राबविणे तसेच शाळा–पालक–ग्रामपंचायत यांच्यात समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने “ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती” (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ही समिती शैक्षणिक गुणवत्ता, पूरक सुविधा, जनजागृती व पटसंख्या वाढीस पूरक उपाययोजनांपुरतीच मर्यादित भूमिका बजावणार असल्याचे ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, शासन स्तरावरून या ठरावाची तातडीने दखल घेण्यात आली नाही आणि शिक्षक कपात धोरणात बदल न झाल्यास, वायंगणीसह मालवण तालुक्यातील ग्रामस्थ शांत न बसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व लाक्षणिक साखळी उपोषण छेडण्याच्या तयारीत असल्याची ठाम भूमिका ग्रामसभेत नोंदविण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा व स्वरूप ग्रामसभा व ग्रामस्थांच्या सामूहिक निर्णयातून निश्चित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

error: Content is protected !!