कुडाळ नगरपंचायतची सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कडक कारवाई

विशेष मोहीम राबवित १३,९०० इतका दंड वसूल
कुडाळ नगरपंचायतच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर कडक बंदी करण्यासाठी बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांकडून एकूण रु. १३ हजार ९०० इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधितांकडून सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
नगरपंचायत मार्फत सर्व व्यापारी, फेरीवाले व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, कुडाळ नगरपंचायत ही स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांच्या सहकार्यानेच हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते.





