कॉजवेचे काम सुरू असताना मिक्सरवाहू ट्रॉली कोसळून अपघात ; चालक बचावला

माड्याचीवाडी-रायवाडी येथील घटना

कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सरवाहू ट्रॉलीचा अपघात झाला. यात चालक सुदैवाने बचावला. त्याच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा मुख्य गाभा खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉली येथे कॉजवेवरून पलटी झाला. साधारण तीन-चार फुटावरून ही मिक्सर ट्रॉली पुलावरून खाली कोसळली.
या अपघातात वाहनाच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने यात चालक बचावला असून त्याच्या हाताच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र मिक्सरवाहू ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम गेले पाच-सहा महिने बंद होते. एका सोसायटी मार्फत ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. त्यानंतर अलीकडे पाच-सहा दिवसापासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पुलाला आधार देण्यासाठी नवीन संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते.
दरम्यान पुलाच्या एका बाजूचा मुख्य गाभा खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सरवाहू ट्रॉली कॉलवेलगत खाली पलटी झाली. साधारण तीन-चार फुटावरून ही मिक्सर ट्रॉली पुलावरून खाली कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून तेथे काम करणारे बाकीचे कामगार बाजूला पळाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तत्परतेने मिक्सरवाहू ट्रॉलीला लोखंडी शीडी लावून चालकाला केबीन बाहेर काढले. सुदैवाने यात चालक बचावला असून त्याच्या एका हाताच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज सायंकाळी उशीरा मिक्सरवाहू ट्रॉलीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

error: Content is protected !!