एसआरएम कॉलेजचे वर्दे येथे एनएसएस शिबिर संपन्न

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागामार्फत सातदिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्दे येथील सिग्मा करिअर अकॅडमीच्या परिसरात २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे शिबीर संपन्न झाले.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. क.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह अनंत वैद्य यांच्या हस्ते शिबीराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी बोलताना अनंत वैद्य सर यांनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. तसेच सध्याच्या काळात मोबाईलच्या वाढत्या गैरवापरास पालक कशा प्रकारे जबाबदार ठरतात, यावर त्यांनी परखड विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच अशा प्रकारच्या निवासी शिबिरांमध्ये स्वतः सहभागी व्हायला आपल्यालाही आवडेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त करून एन.एस.एस. उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी सिग्मा करिअर अकॅडमीचे संचालक संदेश ठाकूर, वर्दे गावाचे प्रथम नागरीक सरपंच माननीय महादेव पालव तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त व राष्ट्रसेवेचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या १५० स्वयंसेवकांनी या निवासी शिबिरात सहभाग घेतला होता. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सबा शहा आणि आभार प्रदर्शन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणव तेंडोलकर यांनी केले.
प्रत्येक सत्र काटेकोरपणे पाळून विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सहभाग नोंदविला. सात दिवसांत बौद्धिक चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर व्याख्याने संपन्न झाली. प्रा.डॉ. व्ही. जी.भास्कर यांनी संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता अभियान तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व या दोन वेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. प्रा. भावेश चव्हाण यांनी स्वभावगुण व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे आपल्या यांनी स्मार्ट गोल या विषयाचे महत्त्व स्वयंसेवकांना समजावून सांगितले. संविता आश्रमचे संदीप परब यांनी सामाजिक बांधिलकी स्वानुभवातून मांडली तर
अॅड. शमा वैद्य यांनी व्यवसाय संबंधी एक वेगळा विचार आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. एन.एस.एस.जिल्हा समन्वयक प्रा.वसीम सय्यद यांनी राष्ट्रीय सेवा योजनामधील विद्यार्थी दशेतील संधी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. संदेश ठाकूर यांनी पदवी नंतर सरकारी नोकरीच्या संधी याबद्दल माहितीपर मार्गदर्शनपर केले. श्रीम. प्रांजळ राऊळ यांनी आरोग्यं धनसंपदा या व्याख्यानातून आरोग्याची महती सांगितली.
दुपारच्या प्रत्येक सत्राला व्याख्यानातून स्वयंसेवकांच्या बौद्धिक जाणिवा विकसित होण्यासाठी प्रयत्न केले.
श्रमदानातून वर्दे गावामध्ये विविध वाडीमध्ये रस्ते दुरुस्ती, रस्ता दुतर्फा असलेली झाडी कापणे, स्वच्छता मोहीम, झाडांना अळी करणे आदी कामे करण्यात आली. डिजिटल साक्षरता, रस्ते सुरक्षा, अमली पदार्थ विरोध, नशामुक्त भारत अशा विविध बाबतीत जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या.
शिबिराचा मुख्य विशेष भागात गटचर्चा करून विविध विषयांवर उहापोह करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढविण्यासाठी मदत झाली. सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी या शिबिराचा समारोप झाला. संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा.भावेश चव्हाण यांनी या शिबिराचे समन्वयक म्हणुन काम पाहिले. तसेच प्रा.प्रणव तेंडोलकर आणि प्रा.सबा शहा यांनीही एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी म्हणून आपली जबाबदारी निभावली.





