प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, जनतेच्या कामात बेदबाबदारपणा दिसता नये!

कणकवली नगरपंचायत चा कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

मंत्रालय पातळीवरील प्रस्ताव पाठपुरावा करून तातडीने मार्गी लावणार

कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था केल्याशिवाय कुठल्‍याही संकुलांना पूर्णत्‍वाचा दाखला देऊ नका. शहरातील सर्व स्वच्छतागृहांची दररोज सफाई व्हायला हवी. नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवा. प्रत्‍येक कर्मचाऱ्यावर कामाची जबाबदारी निश्‍चित करा. कुणाकडूनही बेजबाबदारपणा होता नये. शहरात कुठेही कचरा दिसता नये. नागरिकांना सेवासुविधा पुरविताना दिरंगाई झाली तर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील होईल असे निर्देश नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज प्रशासनाला दिले.
नगराध्यक्ष पदी निवडून आल्यानंतर श्री.पारकर यांनी आज आपल्‍या दालनात प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, नगरपंचायतीचे अधीक्षक अमोल अघम, स्वच्छता कर्मचारी ध्वजा उचले, अमोल भोगले, पाणीपुरवठा अधिकारी मनोज धुमाळे, अभियंता सचिन नेरकर, विभव करंदीकर यांच्यासह चेतन अंधारी, चेतन मुंज, सुजित जाधव, विलास कोरगावकर, तेजस राणे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.
श्री.पारकर यांनी आढावा घेतलेल्‍या बैठकीत शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई होत नस होत नसल्याबाबत आलेल्या तक्रारी, शहरात कुठेही बसून मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरू असणे, शहरातील अनेक संकुलांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्‍याने सांडपाण्याची समस्या निर्माण होणे, शहराच्या अनेक भागातील पथदीप बंद असणे आदी मुद्दे चर्चेला आले. तसेच शहरांमध्ये या भागात पथदीप नाहीत या ठिकाणी पथदिप बसवण्याबाबत कार्यवाही करा याकरिता आवश्यक तो प्रस्ताव तयार करा अशा देखील सूचना त्यांनी दिल्या.
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने पटवर्धन चौकालगतच्या भाजी मार्केटमध्ये ८६ लाख रूपये खर्च करून स्वच्छतागृह उभारले आले. मात्र या स्वच्छतागृहात पाणी उपलब्‍ध नाही. या स्वच्छतागृहात ठिकठिकाणी गळती असल्‍याने दुर्गंधी पसरत असल्‍याचीही बाब समोर आली. यावर चर्चा करताना या स्वच्छतागृहावर पाण्याची टाकी बसविण्यात यावी. या टाकी नगरपंचायतीच्या नळयोजनेतून पाणी पुरवठा करा. तसेच या स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्‍त करा असे निर्देश नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी दिले. तसेच ज्या ठिकाणी कामाच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी शिल्लक आहे अशा ठिकाणी ठेकेदाराला नोटीस काढा व ते काम पूर्ण करून घ्या असेही त्यांनी सांगितले.
कणकवली शहरासाठी सुसज्‍ज मच्छीरमार्केट उभारण्यात आले आहे. तरीही शहरातील किनई रोड, नरडवे रस्ता व इतर ठिकाणी मच्छी विक्रेते बसून आपला व्यवसाय करतात. त्‍याचा फटका मच्छीमार्केटमध्ये असलेल्‍या विक्रेत्‍यांना बसतो अशा तक्रारी येत असल्‍याचीही बाब या बैठकीत निदर्शनास आली. यावेळी श्री.पारकर यांनी संपूर्ण शहरात किती ठिकाणी मच्छी विक्रेते बसून आपला व्यवसाय करतात त्‍याचा आढावा घ्या. त्‍या विक्रेत्‍यांची समस्याही समजून घ्या आणि त्‍यांना मच्छीमार्केट मध्ये व्यवसाय करण्यासाठी विनंती करा असेही निर्देश श्री.पारकर यांनी केले.
शहरातील कंत्राटी तत्‍वारील स्वच्छता कर्मचारी आणि नळयोजना कर्मचाऱ्यांना पूर्ण मानधन द्या. कागदोपत्री १४ हजार रुपये आणि प्रत्‍यक्षात सहा ते सात हजार रुपये मानधन दिल्‍याच्या तक्रार आहेत. यापुढे असे होता नये. कर्मचारी पुरवठा करणाऱ्या संस्थेने किमान नफा ठेवून या कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे. याबाबत कोणाच्याही तक्रारी येता नये असेही निर्देश श्री.पारकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला दिले. यावेळी सर्व वजावट करून कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये खात्यात जमा केले जातात असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले.
कणकवली शहराची नळयोजना जीर्ण झाली आहे. या नळयोजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी नगरपंचायतीने सुधारीत आराखडा तयार करून तो प्रशासनाकडे पाठवला आहे. हा आराखडा सध्या कुठल्‍या अधिकाऱ्यांकडे आहे. हा आराखडा तांत्रिकदृष्‍ट्या परिपूर्ण आहे का याची संपूर्ण माहिती माझ्याकडे द्या, नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून शहराच्या नळयोजना आराखड्याला लवकरच मंजूरी मिळवून आणू अशी ग्‍वाही यावेळी श्री.पारकर यांनी दिली. तसेच कणकवली शहरातील जे विकास कामांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत या प्रस्तावांची यादी मला द्या. मंत्रालय स्तरावर याबाबत पाठपुरावा करून ही कामे लवकर मार्गी लावली जातील. असेही श्री पारकर यांनी यावेळी सांगितले.
कणकवली शहरातील अनेक प्रभागात अजूनही रस्ते तयार झालेले नाहीत. पूर्वीच्या नियोजन आराखड्यामध्ये रस्त्यांची आखणी न झाल्‍याने नगरपंचायतीला नव्याने रस्ते तयार करणे अडचणीत होत आहे. दुसरीकडे शहराचा नवीन विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्यामध्ये नवीन रस्त्यांची आखणी केली जावी. तसेच अन्यायकारक आरक्षणे असू नयेत याअनुषंगाने लवकरच नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी यावेळी दिली.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!