सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ, कणकवली च्या वतीने ऑनलाईन कामांवर बहिष्कार.

कणकवली/प्रतिनिधी
दि.३०/१२/२०२५ रोजी मान.गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कणकवली यांची सर्व शिक्षक संघटना व्यासपीठाच्या वतीने सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित भेट घेतली.
या भेटीत शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या असंख्य ऑनलाईन कामांमुळे निर्माण होणारा मानसिक ताण,तणाव व अन्यायकारक परिस्थिती, प्रशासकीय WhatsApp ग्रुपद्वारे दिल्या जाणाऱ्या सततच्या सूचनांचा ताण,कोणतीही शासकीय साधन सुविधा उपलब्ध नसताना वैयक्तिक मोबाईल व नेटपॅक वापरण्याची सक्ती याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील बाबींचा निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच लेखी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शालेय पोषण आहार ,विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना तसेच शालार्थचे काम पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याची ग्वाही सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आली.
मान. गटशिक्षणाधिकारी महोदयांनी सर्व संघटनांचे म्हणणे संयमाने ऐकून घेऊन सदर विषय वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले .
सर्व संघटना व्यासपीठाच्या वतीने सर्व शिक्षकांना जाहीर आवाहन करण्यात आले.आजपासून पुढील बाबी काटेकोरपणे अमलात आणाव्यात असे आवाहन करण्यात आले यामध्ये,सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी प्रशासकीय WhatsApp ग्रुपमधून त्वरित बाहेर पडावे,शाळांना आवश्यक सुविधा (संगणक / लॅपटॉप / इंटरनेट कनेक्शन) उपलब्ध करून दिल्याशिवाय VSK डेली अटेंडन्ससह कोणतेही ऑनलाईन काम करू नये.सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामकाजावर सर्व संघटना व्यासपीठाचा पूर्ण बहिष्कार राहील,शालेय वेळेत WhatsApp किंवा तत्सम माध्यमांचा वापर करू नये.कार्यालयाकडून कोणतीही माहिती मागविण्यात आल्यास,ती लेखी स्वरूपात मागविल्यानंतरच लेखी स्वरूपात सादर करावी.मोबाईल ही शिक्षकांची खाजगी मालमत्ता असून,नेटपॅकचा खर्च स्वतःच्या खिशातून होत असल्याने कोणत्याही प्रकारच्या ॲपचा वापर करण्यात येऊ नये.





