बलेनो कार अपघात प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अपघातग्रस्त कार ब्लु डार्ट कंटेनर लूट प्रकरणातील
कारच्या धडकेत एका कारचे आणि दुकानांचे नुकसान
शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बलेनो कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत, उभ्या असलेल्या एका कारलाही धडक दिली. ही घटना शहरातील गीता हाॅटेल समोरील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेत दोन्ही गाड्यांचे तसेच एका दुकानाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिसात कार चालक सुजल सचिन पवार, (वय-22 वर्षे, रा. झाराप हा, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्लु डार्ट कुरियर कंपनीची गाडी लुटण्याचा प्रयत्न करून ही कार पलायन करण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती फिर्यादीत नमूद केली आहे.
याबाबत सायबर पोलीस ठाणे ओरोसचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पोलीस रेल्वे स्टेशन, कुडाळ परिसरात असताना कुडाळ पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो. हे. कॉ. / 98 प्रमोद काळसेकर यांनी चालक पो. हे. कॉ. / 1056 महेश जळवी यांना फोन करुन सांगितले की, ब्लू डार्ट क्युरीअर सव्हींसचे शिफ्ट इन्चार्ज शिवराम लक्ष्मण पराडकर यांनी पोलीस ठाण्यात येवून कळविले आहे की, त्यांचा कुरियर सव्हींस करणारा कंटेनर अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे व ती गाडी आता ड्रायव्हरसह ब्लू डार्ट क्युरीअर सर्व्हस ऑफिस एम. आय. डी .सी. कुडाळ येथे आहे. त्या ठिकाणी जावून वस्तुस्थितीची खात्री करा.
त्याप्रमाणे आम्ही तात्काळ कुडाळ रेल्वे स्टेशन येथून ब्लू डार्ट क्युरीअर सर्व्हिस ऑफिस एम. आय. डी. सी. कुडाळ येथे गेलो असता तेथे शिफ्ट इन्चार्ज शिवराम लक्ष्मण पराडकर, लोडर शंकर सखाराम नेमळेकर तसेच महिंद्रा कंटेनर नं. MH 04/LE/0312 वरील चालक मनोज पाल (रा. दहिराम, ता. जि. मिर्जापूर, राज्य उत्तरप्रदेश) तसेच त्याच कंटेनर सोबत कुरियर पार्सल घेवून आलेला दुसरा कंटेनर नं. MH04/LQ/2428 ‘वरील चालक मुनेश (रा. तेंदूआ, लालगंज, ता. जि. मिर्जापूर, राज्य उत्तरप्रदेश) असे उपस्थित होते. त्यांनी आम्हाला सांगितले की, दिनांक-29/12/2025 रोजी रात्री 11.45 वा. चे दरम्यान आम्ही राजापूर येथून कुडाळकडे येत असताना ओसरगाव टोल नाका पास झाल्यानंतर सुमारे 3 ते 4 किमी पुढे आल्यावर एका गडद राखाडी रंगाची बलोनो कार नं. MH 07/AS/0194 च्या गाडी चालकाने मला हातवारे करुन गाडी थांबविण्याचा इशारा केला. गाडीमध्ये किंमती माल असल्यामुळे मी गाडी न थांबवता कुडाळ ब्ल्यु डार्ट ऑफिसच्या दिशेने भरधाव वेगात निघालो असता दिनांक-30/12/2025 रोजी रात्री 01.00 वाजताचे सुमारास पणदुर ब्रिजजवळ त्या गाडी चालकाने आम्हाला ओव्हरटेक करुन आमचे समोर जावुन गाडीतील पाच ते सहा जणांनी माझ्या गाडीवर दगड मारुन डाव्या बाजुच्या आरशाच्या काचेचे नुकसान केले. अशी माहीती सांगितली असता पोलिसांनी त्याला सविस्तर तक्रार देण्यास पोलीस ठाणे कुडाळ येथे येण्यास सांगितले. त्यांनतर पोलीस त्याच्या रात्र गस्तीवर कुडाळ पोलीस स्टेशनच्या दिशेने परत निघाले.
रस्त्यात गवळदेव मंदिर जवळील अभिमन्यु हॉटेल जवळ आले असता, तिथे थांबलेली राखाड्या रंगाची एक बलेनो कार आमचे पोलीस वाहन पाहुन सुसाट वेगात कुडाळ पोलीस स्टेशनच्या दिशेने जाताना दिसली. आम्हाला ती बलेनो कार उपरोक्त नमुद संशयीत कार वाटल्याने पोलिस तीचा मागोवा घेत निघाले, असता 02.40 वा. चे दरम्याने सदर कार कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर माठेवाडा नक्षत्र टॉवरजवळ सिंधुदुर्ग बँकचे एटीएमला, वैभव सिताराम घोगळे यांचे गोबीमंच्युरीयन स्टॉलला व वॅगनर कार क्र. MH-05-CV-1541 ला आपटुन पुढे जावुन रस्त्याचे मधोमध अपघातग्रस्त स्थितीमध्ये थांबल्याची दिसली.
त्या गाडीजवळ जावुन पाहीले असता गाडीच्या एअरबॅग ओपन झालेल्या होत्या व गाडीतुन चार इसम बाहेर पडताना दिसत होते. त्यांना आम्ही थांबवुन त्यांच्या दुखापतीबद्दल चौकशी करुन नाव गाव विचारले असतां चालकाने त्याचे नाव सुजल सचिन पवार, (वय 22 वर्षे, रा.झाराप) तसेच गाडीमध्ये बसलेल्या इतर इसमांनी त्यांची नावे राहुल अमित शिरसाठ, (वय 19 वर्षे, रा. कुडाळ), सिध्दांत अशोक बांदेकर (वय-25 वर्षे, रा. बाजारपेठ कुडाळ), मंदार सोनु उमळकर (वय 18 वर्षे रा. कुडाळ) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता समजले की, ब्ल्यु डार्ट कंपनीच्या कंटेनरचा पाठलाग करणारी हीच ती बलेनो कार होती. तेवढयात अपघाताचा आवाज ऐकूण आजुबाजूचे लोक गोळा झाले. त्यापैकी अनिल ऊर्फ बंड्या सावंत यांनी पोलिसांना येऊन सांगितले की, बलेनो कार आपटुन अपघात ग्रस्त झालेली वॅगनर कार क्र. MH-05-CV-1541 ही त्यांची आहे. तेव्हा, या प्रकाराबाबत तक्रार देण्यास सावंत यांना कुडाळ पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. चार संशयीत इसमांना घेऊन पोलीस पोलीस ठाणे कुडाळ येथे आले.
दि.30/12/2025 रोजी 02.45 वा. आरोपीत चालक सुजल सचिन पवार (वय 22 वर्षे, रा. झाराप, ता. कुडाळ) याने त्याचे ताब्यातील बलेनो कार नं. MH 07/AS/0194 याचा चालक सुजल सचिन पवार, (वय-22 वर्षे, रा. झाराप) हा, त्याच्या ताब्यातील नमूद कार भरधाव वेगात अविचाराने चालवून कुडाळ ते वेंगुर्ला जाणारे मुख्य रस्त्यावर माठेवाडा नक्षत्र टॉवर, कुडाळ जवळील सिंधुदुर्ग बँक एटीएम, वैभव सिताराम घोगळे यांचे गोबीमंच्युरीयन स्टॉलला व वॅगनर कार क्र. MH-05-CV-1541 यांना धडक देवून अपघात करून त्यांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याने पोलीस उप निरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता -2023 कलम 324 (4) 281, 125 व मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये फिर्याद दिली आहे आहे.





