व्याकरणा इतकेच मराठी भाषेतील म्हणींचे ज्ञान महत्वाचे – सुरेश ठाकूर

श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे “माझा महाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य
सुरेश ठाकूर यांनी केले मराठी भाषेविषयी प्रबोधन
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी आणि संप्रदाय यांचा उगम. त्यांचे उपयोजन आणि त्यांची निर्मिती याबाबत शालेय वयातच ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण याचा “माझा महाटाची बोलू कवतिके” हा व्याख्यानपर कार्यक्रम झाला.त्या कार्यक्रमात श्री. ठाकूर बोलत होते. सुरेश शामराव ठाकूर, यांनी “मराठी भाषेचे अलंकार” याविषयी शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाला प्रबोधन केले.
सुरेश ठाकूर आणि सुरेश बांदेकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिमा पूजन आणि दीप पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश गोविंद बांदेकर हे होते, तर प्रमुख अतिथी संजय बांबुळकर, सदस्य शालेय समिती, भगवती एज्युकेशन सोसायटी हे उपस्थित होते.
मराठी भाषेचे अलंकार या सदरात सुरेश ठाकूर यांनी “मराठी भाषेचे संप्रदाय आणि म्हणी” या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले ‘मराठी भाषा लवचिक आहे’ असे सांगितले जाते. जशी वाकवावी तशी वाकते. वाकवणारा जितका निष्णात तितके त्याचे बोलणे, लिहिणे परिणामकारक होते. भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी आणि संप्रदाय यांचा उगम. त्यांचे उपयोजन आणि त्यांची निर्मिती याबाबत शालेय वयातच ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे. कारण संप्रदाय आणि म्हणी कोणत्याही भाषेचे अलंकार असतात, ते भाषेचे सौदर्य वाढवितात हे पटवून देत असताना ठाकूर यांनी अनेक संप्रदाय आणि म्हणी यांची उगमस्थाने गोष्टीरूपातून आणि चर्चेतून मुलाना उलगडून दाखविली. ते पुढे म्हणाले ‘प्रत्येक वाक्यप्रचार आणि म्हणीना रंग, रूप आणि गंध असतो’.
याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले “माझा महाटाची बोलू कवतिके” या अंतर्गत मराठी भाषेचे विविध रूपे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि रसिक ग्रामस्थ यांचे समोर उलगडून दाखविण्याचा कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांचा उपक्रम आहे. यात कथाकथन, नाट्य, व्याकरण, लेखन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी म्हणींच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका श्रीम. गौरी तवटे यांनी केले. तर आभार शिक्षक प्रसाद बागवे यांनी मांनले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.