भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या

मा. आ. वैभव नाईक यांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन वादळजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे असलेले भातपीक परिपक्व झालेले असून भातपिकाची कापणी सुरु आहे. मात्र अवकाळी पावसामुळे हे भातपीक जमीनदोस्त झाले असून सातत्याने पाऊस पडत असल्याने जमिनीवर कोसळलेल्या या भात पिकाला कोंब येत आहेत. काही ठिकाणी उभ्या भातपिकालाही कोंब फुटले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी १५ मे पासून पावसाला सुरुवात झाली असून भात पेरणीच्या हंगामाआधीच जोरदार पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापैकी निम्मेच भात पीक उगवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी प्रमाणात भात शेती करावी लागली. तसेच १०० ते १३० दिवसांचा कालावधी असलेले हे भातपीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत १५० दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भात पिक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे व आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावेत,तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.





