सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर राणे यांचे निधन

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात असायचे अग्रेसर
कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे रहिवासी व सध्या मुंबई घाटकोपर येथील मुरलीधर दिनकर राणे उर्फ मुरली काका (वय 82) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. गावातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या वागण्यात होतं. मंदिर असो, गावाचा उत्सव असो, किंवा कोणाचं सुख – दु:ख, यामध्ये ते नेहमी सहभागी असायचे. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सदस्य, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष समितीचे माननीय संस्थापक म्हणून त्यांनी सामाजिक कार्याचा पाया घट्ट केला होता. मुंबईत राहत असतानाही त्यांनी गावाशी नातं कधीही तुटू दिलं नाही. घाटकोपरमध्ये व्यवसाय उभा करताना त्यांनी फक्त स्वतःचा विकास न पाहता अनेकांना मदतीचा हात दिला. रेशनिंग दुकान व किराणा व्यवसायाच्या माध्यमातून गरीब-गरजूंपर्यंत धान्य पोहोचवणं, कधी प्रसंगी पैसे नसतानाही कोणालाही रिकाम्या हाताने न पाठवणं असा त्यांचा स्थायीभाव होता. मराठी शाळेतील मुलांचे शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांना फार जिव्हाळा होता. ज्या ज्या व्यक्ती शाळेला भेट देत त्यावेळी ते कोणत्या ना कोणत्या स्वरूप आणि शाळेसाठी देणगी उभी करत होते. त्यांच्या निधनाने गावातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा एकत्र कुटुंबाचा परिवार आहे.





