कणकवली तालुक्यातून तब्बल 9630 दाखले विद्यार्थ्यांना घरपोच!

सेवा पंधरावडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राबवले अभियान

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासहित महसूल, शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तेथे दाखले अभियान अंतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वय अधिवास व जातीचे दाखले शाळांच्या माध्यमातून देण्याचे नियोजन कणकवली तालुक्यातील महसूल व शिक्षण विभागाने केले होते. याची पूर्तता करत 8825 वय अधिवास दाखले व 805 जात दाखले असे एकूण 9630 दाखले विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून घरपोच प्राप्त झाले आहेत. अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अभिनव व कल्पक संकल्पनेतून कणकवली तालुक्याने चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये जातीचे दाखले वाटप करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर संपवण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या नेतृत्वात सर्व महसूल अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व CSC, महा-ई-सेवा केंद्र चालक आणि सेतू यांनी जलद कामकाज पार पाडले आहे. तसेच शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या शिक्षकांमुळे हे सर्व दाखले देणे शक्य झाल्याचे तहसीलदार कणकवली यांनी सांगितले. या कामामध्ये श्री. गंगाराम कोकरे श्री. मंगेश यादव श्री. मंडले, मंगल गायकवाड हेमलता तोरसकर, संभाजी खाडे, विलास चव्हाण, चाळके, सिंगनाथ, रणजीत चौगुले, अंकिता बागवे, कांबळे यांनी विशेष कार्य केले. यामध्ये सर्व पालक वर्ग व शिक्षक तसेच कर्मचारी वृंद यांनी खूप मेहनत घेऊन हे अभियान यशस्वी केले.
एकही पात्र विद्यार्थी दाखल्यापासून वंचित राहता नये या जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संकल्पाचे पालकांनी मनापासून स्वागत केले असून पालक वर्गामधून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!