कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडी चे वारे!

दोन धगधगते विचार नवीन समीकरणामधून एकत्र येण्याची शक्यता?

भाजपला रोखण्यासाठी ही युव्हरचना यशस्वी ठरणार का?

दोन पक्षांच्या कणकवलीतील महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहर हे जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू असताना कणकवली शहराला राजकीय दृष्ट्या देखील महत्त्व आहे. त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. असे असताना आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कडून स्वबळाचा संकेत दिला जात असल्याची चर्चा आहे. व या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच कणकवली नगरपंचायत मध्ये पुन्हा एकदा कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून काही समविचारी पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा समोर आली आहे. नुकतीच यातील काही प्रमुख नेत्यांची प्राथमिक चाचपणीच्या अनुषंगाने चर्चा देखील झाली असून एक गुप्त बैठक देखील झाल्याचे समजते. यामध्ये एकाच धगधगत्या विचाराचे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता कणकवली शहरात चर्चिली जाऊ लागली आहे. यामधील या एका पक्षाचे शहरात आघाडीवर असलेले प्रमुख दोन व दुसऱ्या पक्षाचे नुकतीच कणकवली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी खांद्यावर घेतलेला एक नेता हे सध्या या अनुषंगाने चाचपणी करत असून या शहर विकास आघाडीमध्ये यासह अन्य काही मित्र पक्षांना देखील सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदाकरिता शहराच्या राजकारणात वलय असलेल्या नेत्याच्या नावाला देखील त्या नेत्याच्या एकेकाळ्याच्या राजकीय विरोधक असलेल्या अनुभवी नेत्याकडून सकारात्मक भूमिका असल्याचे समजते. परंतु उर्वरित गणिते जुळवा जुळवी वर भर दिला जात आहे. दरम्यान जर अशा प्रकारे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही नवीन राजकीय समीकरणे जुळून आल्यास बहुदा राज्यातील ही अशा प्रकारची पॅनलच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे झालेली पहिली युती असू शकेल. यापूर्वीच्या निवडणुकीत गाव पॅनलच्या माध्यमातून प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी अशी युव्हरचना करण्यात आली होती. मात्र ती यशस्वी झाली नव्हती. आता पुन्हा एकदा कणकवली शहर विकास आघाडी च्या माध्यमातून सध्याच्या राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या पॅनलला तोडीस तोड उत्तर देण्याकरिता ही रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. परंतु एकूणच ही चर्चा पाहता येत्या काळात ही राजकीय समीकरणे जुळणार का? व यातून निकालामध्ये काय फरक दिसणार? त्याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!