खारेपाटण किल्यावर भव्य मशाल महोत्सव साजरा

१०१ मशालीच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला खारेपाटण किल्ला
“दिवाळीचा एक दिवा माझ्या राजाच्या चरणी ” उपक्रमांतर्गत भव्य सोहळा संपन्न
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता दिवाळीचा एक दिवा माझ्या राजांचरणी या उपक्रमांतर्गत किल्ले संवर्धन समिती,खारेपाटण आणि मावळे आम्ही स्वराज्याचे (Rg MH), तसेच ग्रामपंचायत खारेपाटण आणि श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले खारेपाटण येथे दीपोत्सव व मशाल उत्सव मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला.
या ऐतिहासिक अशा उत्सवात खारेपाटण मधील सर्व स्थानिक सामाजिक मंडळे, संस्था, महिला व शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने दीपोत्सवामध्ये सहभागी झाले होते.
श्री केदारेश्वर मंदिर येथून एस टी बस स्टॅण्ड मार्गे खारेपाटण बाजारपेठ ते थेट खारेपाटण किल्ला येथे भव्य मशाल मिरवणूक यावेळी काढण्यात आली.
मात्र सायं. ६.०० वा. अचानक पाऊस पडल्याने सर्वांचा थोडा हिरमोड झाला तरी मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेच पदाधिकारी आणि किल्ले संवर्धन समिती चे पदाधिकारी मशाल फेरी काढण्यावर ठाम होते. आणि विशेष म्हणजे गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने किल्ल्या वर जमा झाल्या होत्या.पाऊस थांबल्यावर ठीक सायं. ७.३० वाजता मशाल फेरीला सुरुवात झाली व केदारेश्वर मंदिर बस स्थानक बाजारपेठ मार्गे केंद्रशाला खारेपाटण मार्गे मशाल फेरी किल्ल्यावर पोचली. तिथे संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीला सुमारे १०१ मशाली पेटवून मशालोत्सव साजरा करण्यात आला यावेळी किल्ला परिसर तेजाने उजळून निघाला.
यावेळी बालेकिल्ला बुरुजावरून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.उपस्थित नागरिकांनी यावेळी “जय भवानी जय शिवराय,”छत्रपती शिवाजी महाराज की जय, “छत्रपती संभाजी महाराज की जय, “हर हर महादेव” अशा गगन भेदी गर्जना देऊन खारेपाटण किल्ला परिसर दणाणून सोडला. तर वर्षभर किल्ले खारेपाटण येथे गडाची तटबंदी स्वच्छता मोहिमेसाठी राबवलेल्या दुर्ग सेवकाच मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर, किल्ले संवर्धन समितीचे श्री. मंगेश गुरव, श्री. ऋषिकेश जाधव, श्री. संकेत शेट्ये, श्री. तेजस झगडे, श्री देवानंद इसवलकर, मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेचे वैभववाडी शाखेचे श्री. अक्षय तेली, श्री. दिनेश माने, श्री. अनिकेत तर्फे, प्रथम चव्हाण, श्री. आडविलकर, युवराज खांडेकर आणि त्यांचे सहकारी यांसह श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी श्री. बबन तेली व महिला कार्यकर्त्या श्रीम. साधना धुमाळे, सौ. किर्ती शेट्ये, सौ. प्राप्ती कट्टी ग्रामस्थ श्री. संतोष पाटील, श्री. शेखर कांबळे या सह मोठ्या संख्येने शिवप्रेमी किल्यावर उपस्थित होते.
यावेळी किल्ले संवर्धन समिती या वतीने मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेचे पदाधिकारी व सर्व उपस्थितींचे आभार मानून अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





