शिक्षकाने कानशिलात लगावले, प्रकरण थेट एसपी पर्यंत पोहोचले!

समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एका “गावा”तील हायस्कूल मधील शिक्षकाच्या “हिम्मत” ने पालक बेजार
पोलिसांच्या कारवाईकडे पालक वर्गाचे लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या एका दहावी मधील विद्यार्थ्यांच्या जोरदार कानाखाली मारल्यामुळे या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे त्या शिक्षकाच्या विरोधात “त्या” विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी देखील त्या शिक्षकाने अशा प्रकारे अन्य एकाच्या बाबतीत आपल्या उच्च विद्या विभूषित “सनदे” मुळे यापूर्वी “हिम्मत” केली होती. त्यातून त्याचा धीर चेपल्यामुळे त्याची पुन्हा ही “हिम्मत” झाली अशी देखील चर्चा त्या तालुक्यात व तो राहत असलेल्या “वाडी”च्या भागात आहे.
याबाबत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या व निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एक “गाव” असलेल्या हायस्कूलमध्ये सदरचा प्रकार 19 ऑगस्ट रोजी घडल्याचे त्या निवेदनात म्हटले आहे. या हायस्कूल मधील कार्यरत असणारा तो यापूर्वी वादग्रस्त ठरलेला शिक्षक या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. दरम्यान अशाच एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत 19 ऑगस्ट रोजी सदरची मारहाण करण्याची घटना घडली. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सदर घटनेबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, त्या शिक्षकावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावातील हायस्कूल मध्ये कार्यरत असला तरी कणकवली शहरालगतच्या एका गावातील “वाडी”त त्याचा राहण्याचा “संबंध” असल्यामुळे त्या गावातील वाडी मध्ये देखील हा विषय चर्चेचा बनला आहे. त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणी मुळे शिक्षण घेत असलेल्या त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक व शारीरिक नुकसान झाले असल्याचा देखील आरोप त्या निवेदनात केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





