केपीएल कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी आवश्यक ती जबाबदारी घेऊ – उदय सामंत

केपीएल अश्वमेध २०२५ गौरवग्रंथाचे कुडाळमध्ये प्रकाशन

उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे आवाहन

कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांना आनंद आणि समाधान देणारा केपीएल हा उपक्रम असून, या माध्यमातून सुरू असलेले कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे. समाजातील एकोपा, सांघिक भावना आणि आपलेपणा कायम टिकवायचा असेल तर केपीएल स्पर्धा अखंडपणे सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व जबाबदारी घेण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा केपीएल कोअर कमिटीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. केवळ स्पर्धेचे आयोजन करण्यापुरते मर्यादित न राहता, या स्पर्धेतून किमान एक तरी दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करा. त्या खेळाडूच्या पुढील वाटचालीची जबाबदारी माझ्यावर सोडा, असे आवाहनही त्यांनी केले.
गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था संकुलात रविवारी सायंकाळी आयोजित केपीएल अश्वमेध २०२५ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘तरुण भारत संवाद’च्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, बॅ. नाथ पै प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ हायस्कूलच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुलभा देसाई, ‘व्याध’ साप्ताहिकाच्या संपादिका संजीवनी देसाई, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, गौड ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष तथा क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, तेंडोली जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई आणि तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नांदीनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उदय सामंत पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पुण्यातील ज्ञातीबांधवांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने केपीएलच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे केपीएलचा अश्वमेध यशस्वी झाला. भविष्यात या उपक्रमाचा आदर्श अन्य ज्ञातींनीही घ्यावा, इतके भरीव काम उभे राहिले पाहिजे. संघर्षातून पुढे जात आपल्या समाजाने राजकारणासह विविध क्षेत्रांत स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
मराठी मातृभाषेनंतर आपली बोलीभाषा म्हणून मालवणी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मालवणी भाषेतील आपुलकी आणि गोडवा जपण्याची गरज आहे. आमदार निलेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यात मालवणी भाषेचाही समावेश असेल. मालवणी शब्दकोश तयार करण्याची संकल्पनाही असल्याचे त्यांनी सांगितले. ही भाषा पुढील पिढ्यांपर्यंत टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
केपीएल ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून समाजातील सांघिक भावना आणि एकोपा वाढविणारे व्यासपीठ आहे. या स्पर्धेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ज्ञातीतील खेळाडूंनी देशपातळीवरील मोठ्या टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होण्याइतकी गुणवत्ता निर्माण करावी. तसेच रत्नागिरी येथे लवकरच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी अकॅडमी सुरू करण्यात येणार असून, त्याचा सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ज्ञातीतील अधिकाधिक तरुण उच्च पदांवर अधिकारी व्हावेत, यासाठी आपले सहकार्य राहील. समाजातील वंचित घटकांनाही अशा उपक्रमांमध्ये सामावून घेतले पाहिजे, असेही सामंत यांनी नमूद केले.
शेखर सामंत यांनी क्रिकेटमध्ये वैयक्तिक कौशल्याइतकीच संघभावना महत्त्वाची असल्याचे सांगितले. हीच भावना समाज आणि ज्ञातीला अधिक मजबूत करते. ज्ञातीतील तरुणांचा उत्साह, एकसंधपणा, सकारात्मकता आणि खिलाडूवृत्ती यामुळे केपीएलचा दहा वर्षांचा प्रवास यशस्वी झाला. या प्रवासातील मैत्री, आठवणी आणि क्रीडाप्रेमाचा इतिहास जपणारा हा अश्वमेध गौरवग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले.
मनीष दाभोलकर यांनी गौरवग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. केपीएलच्या दहा वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचे प्रसंग अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ग्रंथात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात कुडाळेश्वरचा समर्थ इतिहास लिहिला जाईल, तेव्हा केपीएल आणि अश्वमेध गौरवग्रंथाचा उल्लेख सुवर्णकाळ म्हणून केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाले. स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीत कार्यकर्त्यांचे योगदान आणि नियोजन महत्त्वाचे ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात रणजित देसाई यांनी गौरवग्रंथाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. लेखक, साहित्यिक तसेच प्रतिष्ठान आणि गौड ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. केपीएलच्या दहा वर्षांच्या पर्वात तीन वर्षे सिंधुदुर्गात स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगून आगामी काळात स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या समाजभवनासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गौरवग्रंथाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या डॉ. पूजा सामंत, ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत, वेदिका दाभोलकर आणि उमाकांत सामंत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे सदस्य प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. या सोहळ्याला प्रतिष्ठान आणि गौड ब्राह्मण सभेचे पदाधिकारी, सदस्य, केपीएलचे कार्यकर्ते तसेच ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!