यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय समोर ठेवा ! – कुलगुरू डॉ. संजय भावे

पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये ६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
पुढील आयुष्याची वाटचाल सुखकर करायची असेल, तर संपत्तीपेक्षा समाधानाला महत्त्व द्या. चरितार्थाबरोबरच चारित्र्यही महत्त्वाचे असून, आई-वडील आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय समोर ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
हुमरमळा-कुडाळ येथील श्री. पुष्पसेन ज्ञानपीठाच्या पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये आयोजित पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ६६ पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी फार्मासिस्टची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे आणि नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड उपस्थित होते.
यावेळी विजय काळे, भुपतसेन सावंत आणि नूतन परब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पदवीदान समारंभानंतर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा संवाद मेळावा झाला. यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव कथन करून नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






