मोबाईल घेणाऱ्या ग्राहकाशी उद्धट वागणे आले अंगाशी, दुकानातील “त्यांना” प्रसाद

मोबाईलच्या रंगावरून मात्र त्यांचा झाला बेरंग

पोलीस व लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने वादावर पडदा

कणकवली शहरातील डीपी रोड लगत असलेल्या एका मोबाईल दुकानात मोबाईल च्या रंगाच्या कारणातून झालेल्या वादात उद्धट वागणाऱ्या दुकानातील काहींना प्रसाद मिळाला. अखेर तिथे दाखल झालेले पोलीस व लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने यावर पडदा पडला. त्या दुकानात कामाला असलेल्या कुडाळ तालुक्यातील त्या युवकाच्या वागण्यामुळे त्याला पुन्हा प्रसाद “देऊ” केला होता. परंतु वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे बाका प्रसंग टळला. याबाबत उपलब्ध माहितीनुसार डीपी रोड नजिक असलेल्या एका मोबाईल दुकानामध्ये कणकवली शहरातील एक एक जण मोबाईल घेण्यासाठी गेला होता. यादरम्यान ज्या रंगाचा मोबाईल त्याने निवडला तो मोबाईलचा बॉक्स न उघडता दुसऱ्याच रंगाचा मोबाईलचा बॉक्स उघडला गेला. परंतु तो रंग त्याला पसंत नसल्यामुळे या स्थानिक ग्राहकाने मला मी सांगितलेल्याच रंगाचा मोबाईल हवा असा आग्रह धरला. याच दरम्यान सुरुवातीला मोबाईल निश्चित केल्यानंतर बिलिंग ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पैसे देऊन झाल्यानंतर त्या दुकानातील एकाने जो आता बॉक्स उघडला तो पाहिजे तर घ्या नाहीतर जा अशी उद्धट भाषा त्या स्थानिकाबरोबर केली. याच दरम्यान वादावादी होत हमरातुमरी देखील झाली. यामध्ये स्थानिकाच्या अंगावर या दुकानातील कुडाळ मधून तिथे कामाला येणारे काहीजण गेले अशी चर्चा होती. अंगावर जाण्याच्या प्रकारामुळे त्या स्थानिकाने आपल्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेत त्या ठिकाणी त्यातील काहींना “कॉर्नर”ला घेऊन प्रसाद दिला. त्यानंतर बराच वेळ या ठिकाणी गर्दी जमली होती. दरम्यान आज याच दुकानामध्ये अन्य एका सोबत देखील अशी शाब्दिक बाचाबाची झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रसाद मिळाल्यानंतर त्या दुकान व्यवस्थापनाकडून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस व तेथील लोकप्रतिनिधी असलेल्या एकाच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला. परंतु कणकवली या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू होती.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!