कुडाळमध्ये भरदिवसा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला ; संशयिताला पकडले

महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक
नागरिकांच्या सतर्कतेमुळे लाखोंची रोकड सुरक्षित
कुडाळ शहरातील पानबाजार परिसरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून बँकेतील लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बँक कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.
मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारात एका तरुणाने बँकेत प्रवेश करून महिला कर्मचाऱ्याला चाकू दाखवत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्याला रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेत बँकेतील रोकड सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकारात आणखी एक संशयित सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि पोलीस कर्मचारी प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.






