कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्याचा लाभ

तहसीलदारांचे अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना तसेच अंत्योदय अन्न योजनेद्वारे कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्याचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, कुडाळ येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ४४ हजार रुपये, तर शहरी भागातील उत्पन्नाची मर्यादा ५९ हजार रुपये असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. पात्र लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू मोफत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेची छायांकित प्रत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डच्या प्रती जोडून तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा.
तसेच अंत्योदय अन्न योजनेंतर्गत विधवा निराधार, दिव्यांग निराधार आणि वृद्ध निराधार अशा शिधापत्रिकाधारकांपैकी दोनपेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबांना दरमहा २० किलो तांदूळ व १५ किलो गहू देण्यात येतो. या योजनेसाठी अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, ग्रामसभेचा ठराव आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
दोन्ही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.






