जिल्हा परिषदेत समन्वयाचा अभाव – रुपेश पावसकर

लोकांच्या प्रश्नांसाठी अपक्ष म्हणून लढणार !
गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
जिल्हा परिषद प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने सर्वसामान्य जनतेची विकासकामे खोळंबली आहेत. जनतेच्या प्रश्नांवर सभांमध्ये चर्चा आणि ठराव होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने हे चित्र बदलण्यासाठी आपण अपक्ष म्हणून जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहणार आहोत, असा निर्धार जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत पावसकर म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जनतेची कामे करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात एकमत नसल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आपण कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करत नसून अपक्ष आहोत. त्यामुळे आपली निष्ठा केवळ जनतेशी आहे.
रेन हार्वेस्टिंगच्या ३ कोटी ६० लाख रुपयांच्या कामाबाबत तसेच ११२ भजनी मंडळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत स्पष्टता का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रश्न राजकारणाचे नसून गावाच्या विकासाशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रशासनाने मनमानी न करता या विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
चांगल्या कामांना आपण निश्चितच पाठिंबा देऊ; मात्र चुकीच्या कामांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यास मागेपुढे पाहणार नाही. जनतेने आपल्याला कोणाच्या दबावाखाली काम करण्यासाठी नव्हे, तर निर्भीडपणे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आगामी काळातही प्रत्येक सभेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे. अन्यथा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावा लागेल, असा इशाराही रुपेश पावसकर यांनी दिला.






