कुडाळमध्ये २६ नोव्हेंबरला FSSAI लायसन्स नूतनीकरण व नवीन नोंदणीसाठी विशेष शिबिर

खाद्यपदार्थ व्यावसायिकांसाठी व्यापारी महासंघाचा पुढाकार

मुदत संपणाऱ्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे आवाहन

खाद्यपदार्थ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना FSSAI (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण) परवान्याचे नूतनीकरण तसेच नवीन नोंदणी करता यावी, यासाठी कुडाळ येथे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यातील १२० ते १३० व्यावसायिकांनी FSSAI नोंदणी केली होती. त्यापैकी अनेकांच्या परवान्यांची मुदत आता संपत आली आहे. मुदत संपल्यानंतर परवाना नूतनीकरण न केल्यामुळे संबंधित व्यावसायिकांना कारवाई अथवा दंडाला सामोरे जावे लागू नये, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यालयात होणार आहे. या शिबिरात FSSAI परवान्याचे नूतनीकरण आणि नवीन परवाना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघटना आणि कुडाळ हॉटेल लॉजिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच अन्य संबंधित व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!