दिवंगत आत्माराम जाधव यांच्या ‘कसरत ‘ या आत्मकथनाचा एसपीके कॉलेज बी. ए. च्या अभ्यासक्रमात समावेश

वेंगुर्ले येथील दिवंगत मुख्याध्यापक आत्माराम पुंडलिक जाधव यांच्या ‘कसरत’ या आत्मकथनाचा समावेश श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी च्या प्रथम वर्ष कला सत्र 2 साठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी हे मुंबई विद्यापीठ संचालित स्वायत्त महाविद्यालय असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी 10 वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता दिली आहे.
जीवनाची कसरत सांभाळताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या माणसांविषयी व्यक्त झालेला आत्मीय भाव हा या आत्मकथनाचा गाभा आहे. हे आत्मकथन आपल्या जिवलगां शी हितगुज करावे तसे आणि सुसंवादाची निखळ अपेक्षा व्यक्त करणारे मनस्वी असे आहे. मनाच्या दुभंग होणाच्या प्रत्येक क्षणाला ते तटस्थ आणि निरपेक्ष राहत बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचा सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा स्वाभिमाने जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळेच ते कसे जगले, सामाजिक दृष्टया उपेक्षित, वंचित आणि त्यातही परकोटीचे दारिद्रय असलेल्या पार्श्वभूमीवर हताश न होता शिक्षणाचा ध्यास घेऊन आपले जीवन समृद्ध करणाऱ्या एका जिद्दी आणि स्वाभिमानी व्यक्तीचा जीवनप्रवास विध्यार्थ्यानी अनुभवावा, त्यांच्या जीवनातही तो मार्गदर्शक आणि प्रेरक ठरावा या हेतूने ‘कसरत ‘ या आत्मकथनाचा समावेश अभ्यासक्रमात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने केला आहे. महाविद्यालयामध्ये दि. 8जुलै 2026 रोजी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाची सभा झाली. सदर सभेत अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रथम वर्ष कला सत्र 2 साठी मराठीच्या अभ्यासक्रमात,’कसरत ‘ या आत्माकथनाचा समावेश करण्यात सहमती दर्शविली. कसरत या आत्मकथनाचा समावेश केल्याबद्दल आत्माराम जाधव यांचा जेष्ठ मुलगा सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग अध्यक्ष अनिल जाधव, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी चे केंद्रीय साहित्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ कदम, जेष्ठ साहित्यिक सुनील हेतकर, वीरधवल परब, कवयित्री सरिता पवार, कविवर्य सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, संध्या तांबे यांनी समाधान व्यक्त केले आहे.






