३३ हजार सुप्त पोस्टखात्यांत दीड कोटींची बचत ; रक्कम परत मिळणार

जुन्या बचत खात्यांची तपासणी करण्याचे पोस्ट विभागाचे आवाहन

बचत, विमा, आधार, बँकिंगसह लॉजिस्टिक्सच्या विविध सेवांची माहिती

गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्ट खात्यात सुमारे ३३ हजार सुप्त (निष्क्रिय) खाती आढळली असून, या खात्यांमध्ये खातेदारांचे सुमारे दीड कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम संबंधित खातेदारांना अथवा त्यांच्या वारसांना परत मिळावी, यासाठी पोस्ट विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची तसेच कुटुंबातील जुन्या पोस्ट खात्यांची तपासणी करून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहात बुधवारी सायंकाळी पोस्ट विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कुडाळ औद्योगिक समूह डाकघराचे पोस्टमास्तर विकास वर्मा, डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नितीन नेमळेकर, प्रकाश गावडे, विमा अधिकारी संदीप कसपले, मार्केटिंग अधिकारी रविकांत मोर्ये, शुभम घिगे, गिरीश बोबलेकर आदी उपस्थित होते.
पोस्टमास्तर विकास वर्मा म्हणाले, “तुमची बचत, तुमची सुरक्षा आणि तुमची सेवा” या उद्देशाने डाक विभाग कार्यरत आहे. डाकघरांमध्ये अनेक अशी खाती आहेत, ज्यामध्ये दीर्घकाळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अनेक खातेदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या खात्यांची माहितीही नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जुनी बचत खाती, आरडी, टीडी, एमआयएस, एनएससी, केव्हीपी आदी खात्यांची जवळच्या डाकघरात जाऊन तपासणी करावी. जुने खाते हे केवळ एक रेकॉर्ड नसून अनेक वर्षांच्या मेहनतीची बचत असू शकते, असे त्यांनी सांगितले.
नितीन नेमळेकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने निष्क्रिय खाती असून त्यामध्ये मोठी रक्कम पडून आहे. पोस्ट विभागाच्या माध्यमातून ही रक्कम संबंधित खातेदार अथवा त्यांच्या वारसांना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करून खातेदारांनी आपली रक्कम ताब्यात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डाकघरांमध्ये नागरिकांसाठी बचत खाते, आरडी, टीडी, एमआयएस, एससीएसएस, पीपीएफ, एनएससी, केव्हीपी, सुकन्या समृद्धी योजना आदी अल्पबचत योजना उपलब्ध आहेत. या योजनांचे व्याजदर भारत सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनांची माहिती जवळच्या डाकघरातून घ्यावी, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमा अधिकारी संदीप कसपले यांनी पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत विमा संरक्षण पोहोचविण्यात RPLI महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डाक विभाग वैयक्तिक ग्राहकांसोबतच व्यापारी, एमएसएमई आणि ई-कॉमर्स व्यवसायांसाठीही महत्त्वाचा लॉजिस्टिक पार्टनर म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्केटिंग अधिकारी रविकांत मोर्ये यांनी सांगितले की, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल पार्सल सेवांसोबत व्यापारी ग्राहकांसाठी नियमानुसार बिझनेस अँग्रीमेंटची सुविधाही उपलब्ध आहे. व्यापारी आपली उत्पादने देशातील विविध भागांत तसेच परदेशात पाठविण्यासाठी जवळच्या डाकघराशी संपर्क साधू शकतात. विविध देशांमध्ये कमी दरात गणपती मूर्ती पाठविण्याची सुविधाही पोस्ट विभागामार्फत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश गावडे यांनी डाकघरांमधील आधार एनरोलमेंट व अपडेट, मोबाईल क्रमांक अपडेट, डिजिटल व फायनान्शियल सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या विविध सेवांची माहिती दिली. बचत व वित्तीय सेवा, विमा, मेल, स्पीड पोस्ट, पार्सल व लॉजिस्टिक्स, व्यापार विकास, आधार सेवा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध सेवा पोस्ट विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या पोस्ट खात्यांमध्ये आपली अथवा आपल्या कुटुंबीयांची बचत शिल्लक आहे का, याची नागरिकांनी आवर्जून तपासणी करावी आणि आपल्या बचतीकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन यावेळी पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

error: Content is protected !!