नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार, २६ व शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था, नांदगाव संचलित सरस्वती हायस्कूल या प्रदर्शनाचे यजमानपद भूषविणार आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कणकवली सभापती हर्षदा वाळके राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, पंचायत समिती उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या प्राची इजवलकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये आदी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस विविध स्पर्धा व उपक्रम
गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नोंदणी, ९.१५ वाजता प्रतिकृती मांडणी, १०.३० वाजता उद्घाटन समारंभ, ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण तसेच निबंध स्पर्धा, दुपारी १२ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि दुपारी १ वाजता भोजन असा कार्यक्रम आहे.
शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी निर्मित केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व माध्यमिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचर यांनी निर्मित केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व परीक्षण होणार आहे. सकाळी ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता भोजनानंतर दुपारी २.३० वाजता समारोप व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
बक्षीस वितरणाला मान्यवरांची उपस्थिती
शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला पंचायत समिती सभापती हर्षदा हनुमंत वाळके आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर, तिवरेचे सरपंच रविंद्र आंबेलकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, बेळणे बुद्रुक सरपंच अविनाश गिरकर, ओटव उपसरपंच दुर्गेश ओटवकर, संस्थेचे उपाध्यक्ष दयानंद भिवाजी लोके, सचिव कृष्णा वसंत म्हसकर, खजिनदार सुभाष विडये, कार्यकारीणी सदस्य श्रीधर मोरये, अॅड. दीपक अंधारी व गजानन रेवडेकर यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्रप्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, समग्र शिक्षण अभियान कणकवली तसेच कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पना, संशोधनात्मक प्रयोग आणि नावीन्यपूर्ण प्रतिकृती सादर करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






