सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिनानिमित्त ‘स्वराज्याचा सागरध्वज’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

आमदार प्रमोद जठार यांची आहे ही संकल्पना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय दूरदृष्टीतून साकारलेल्या सागरी सामर्थ्याचे आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिनानिमित्त बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे ‘स्वराज्याचा सागरध्वज’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाची संकल्पना श्री. प्रमोद जठार यांची असून, कोकण विकास आघाडी, मुंबईचे श्री. सुहास अडीवरेकर हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.

या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी सामर्थ्य, आरमाराची दूरदृष्टी, सिंधुदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक निर्मिती आणि स्वराज्याच्या पराक्रमाची गाथा संगीत व सांस्कृतिक सादरीकरणातून उलगडण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक नंदेश उमप, केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे आणि विद्या करलगीकर आपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक उपक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लोकसहभागातून दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी संकलित करण्यात येणार आहे. इतिहासाचा गौरव, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामाजिक दायित्व यांचा संगम या उपक्रमातून साधला जाणार आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ऐतिहासिक पायाभरणी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

  • कार्यक्रम : स्वराज्याचा सागरध्वज
  • निमित्त : सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिवस
  • दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ७ वाजता
  • स्थळ : रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई

आयोजक : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन

संकल्पना : श्री. प्रमोद जठार

संयोजक : श्री. सुहास अडीवरेकर, कोकण विकास आघाडी, मुंबई

error: Content is protected !!