सौ. उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या ललित लेख संग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा श्रि.दा ग्रंथ पुरस्कार जाहीर

सौ. उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर ‘ या ललितलेख संग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘श्रि.दा. ग्रंथ पुरस्कार ‘जाहीर झाला आहे. येत्या बारा डिसेंबर 2026 रोजी पुणे येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला विधायक दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे या विचारातूनच श्रि.दा. ग्रंथ पुरस्कार उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.या वर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. अनुवादीत, शैक्षणिक,कथासंग्रह,
कवितासंग्रह,कादंबरी,नाटक, चरित्र,वैचारिक ,ललित,प्रवासवर्णन बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांतील अनेक उत्तमोत्तम पुस्तके या स्पर्धेसाठी प्राप्त झाली होती.
प्राप्त झालेल्या ग्रंथाचा साहित्यिक दर्जा, आशयघनता लक्षात घेऊन सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करणे हे परीक्षक मंडळासाठी मोठे आव्हानच ठरले.परिक्षकांनी अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने प्रत्येक पुस्तकाचे वाचन व मूल्यांकन करून साहित्याची भाषाशैली, आशयघनता, मांडणी आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अशा विविध निकषांच्या आधारे उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात आली.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने “आठवणींच्या हिंदोळ्यावर ” या पुस्तकाला मिळालेला सन्मान म्हणजे त्यांच्या लेखणीचा गौरव आहे आणि पुढील प्रवासासाठी मिळालेली एक नवी ऊर्जा आहे. या अगोदर सुद्धा या पुस्तकाला राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






