तिसऱ्या अखिल भारतीय चित्र-शिल्प कला संमेलनाच्या निमित्ताने अखंड चित्रकला अभियान’

सहभागी होण्याचे करण्यात आले आहे आवाहन

अखंड लोकमंचने भारतातील पहिले अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन घेऊन एका नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे.

दोन चित्रकला कार्यशाळा आणि दोन संमेलनं यापूर्वी पार पडली. पहिले कणकवली व दुसरे पुणे येथे दिमाखात पार पडले.

अखंड लोकमंच, आता लवकरच होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय चित्र-शिल्प कला संमेलनाच्या निमित्ताने ‘अखंड चित्रकला अभियान’ अंतर्गत दि. ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत गोपूरी आश्रम, कणकवली येथे ड्रॉईंग अँड पेंटिंग वर्कशॉपचे आयोजन करत आहे.

या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे ज्येष्ठ चित्रकार श्री. रवी मंडलिक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत विनायक परब – ज्येष्ठ पत्रकार, संपादक , कला समीक्षक आणि पुरातत्त्व अभ्यासक हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
क्युरेटर म्हणून मुंबईचे सुरेंद्र जगताप (सचिव, बॉम्बे आर्ट सोसायटी, प्राचार्य – जे. के. डिग्री कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट) आणि गोव्याचे राजेंद्र उसपकर काम पाहणार असून, सहाय्यक क्युरेटर म्हणून चकोर साळुंखे असतील.

या कार्यशाळेत बी.एफ.ए. अंतिम वर्ष, जी.डी. आर्ट (पेंटिंग) किंवा एम.एफ.ए. चे विद्यार्थी तसेच २० वर्षांवरील स्वतंत्र कलाकार (freelance artist) सहभागी होऊ शकतात. सहभागासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कलाकारांनी आपला बायोडाटा, किमान ५ कलाकृतींचे फोटो, पत्ता आणि स्वतःचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलवर पाठवावा. सहभाग निश्चित झाल्यानंतर सहभाग शुल्क रु. १५००/- भरावे लागेल.

आयोजकांतर्फे दोन कॅन्सन पेपर, अॅक्रीलिक कलर आदी साहित्य, तसेच चहा, नाश्ता,जेवण आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था दिली जाणार आहे. कलाकारांनी स्वतःचे ब्रश व तांत्रिक साहित्य आणावे.

या कार्यशाळेत सहभागी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यातील १० गुणवंत कलाकारांना पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असून, एकूण रु. ५०,०००/- ची बक्षिसे १० कलाकारांमध्ये वाटली जाणार आहेत. त्यांना स्मृतिचिन्हही दिले जाणार आहे. पुरस्कार वितरण ६ डिसेंबर रोजी होणार आहे.

ख्यातनाम चित्रकार रवी मंडलिक हे भारतीय आधुनिक चित्रकलेतील एक महत्त्वाचे नांव आहे. रवी मंडलिक हे प्रामुख्याने अमूर्त चित्रशैलीत काम करणारे प्रयोगशील चित्रकार आहेत. निसर्गातील पंचमहाभूते, ऊर्जा, रंग, आकार आणि पोत यांच्या माध्यमातून ते आपल्या चित्रांतून वेगळा कलानुभव साकारतात.

अशा ज्येष्ठ आणि अनुभवी चित्रकारांचे मार्गदर्शन कार्यशाळेतील विद्यार्थी व कलारसिकांना लाभणार असून, त्यांच्या कलाप्रवासाचा, चित्रशैलीचा आणि सर्जनशील विचारांचा जवळून परिचय करून घेण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.

सिंधुदुर्गातील कलाकारांसाठी तसेच देशभरातील कलाकारांसाठी ही एक मोठी संधी असल्याचे अखंड लोकमंचचे अध्यक्ष नमानंद मोदक यांनी सांगितले.

संपर्क : स्वामी आर्ट्स, ३६१/५, बाजारपेठ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२

विनायक – 9404940217, शैलजा – 8805292596, 9422436028

ई-मेल : akhand.lokmanch@gmail.com, namananad.modak@gmail.com

error: Content is protected !!