कणकवलीत काही हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी ची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी सुरू झाल्याने खळबळ!

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गात देखील अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर

आज सूचना यानंतर थेट कारवाई करण्याचा इशारा

खुलेआम मिळणारा गुटखा अद्याप बंद न झाल्याने व्यक्त केले जातेय आश्चर्य

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी आल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे त्याची इफेक्ट आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील दिसू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज या विभागाने कणकवलीत अचानक काही हॉटेल रेस्टॉरंट विक्री आदींची तपासणी केली. या विभागाने सुरू केलेल्या या अचानक तपासणीमुळे हॉटेल रेस्टॉरंट्स संबंधित व्यवसायिकांचे मात्र धाबे दणाणले आहेत. गेल्या आठवड्यात गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर सोमवारपासून आता हॉटेल्स, रेस्टॉरंट, बेकरी आणि स्ट्रीट फुडधारकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कुडाळ मधील एका राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी तेथील बाजारामध्ये घेतलेल्या कलिंगन चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केल होते. त्या तक्रारीचे देखील या अचानक सुरू केलेल्या तपासणी मागे कारण असल्याचे समजते. सोमवारी कणकवलीत काही हॉटेल्स, बेकरी आणि स्ट्रीटफुड स्टॉलधारकांना भेटी देत तेथील स्वच्छता, खाद्य पदार्थांचा दर्जा याची तपासणी करत स्वच्छतेबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. विशेषत: वर्तमानपत्राच्या कागदात वडापाव आणि भजी बांधून देता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोर आणि बेकायदा गुटखा विक्री विरोधात जोरदार छापासत्र सुरू करून अनेकांना गजाआड केले आणि कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत केला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपल्या विभागांना भेसळखोर आणि गुटखा, पान मसाला विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्तच ॲक्शन मोडवर आल्याने या विभागाने जिल्ह्यात कारवायांचे सत्र सुरू केले आहे. सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यात बेकायदा गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात कारवाया करून पाचजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र आजही टपऱ्यांवर मिळणारा गुटखा पान मसाला हे या कारवाईत नजरेआड कसे होते? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये सावंतवाडी, वैभववाडी आणि मालवण तालुक्यात प्रत्येकी एक तर कुडाळ तालुक्यात दोन अशा पाच केसेस करण्यात आल्या. यापुढेही संबंधितांवर या विभागाची करडी नजर असणार आहे. तर सोमवारपासून हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट आणि स्ट्रीटफुडधारकांकडे या विभागाने आपला मोर्चा वळवला आहे. सोमवारी कणकवलीत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही हॉटेल्स, बेकरी आणि स्ट्रीटफुडधारकांना भेटी देवून तेथील स्वच्छता तेल आणि खाद्य पदार्थांचा दर्जा याची पाहणी केली. खाद्य पदार्थ बनविणारे आणि वेटर्सनेही हेडकॅप वापरणे तसेच हॅण्डग्लोजचा वापर करावा. ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी असे स्पष्ट निर्देश संबंधितांना देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड म्हणाले, बेकायदा गुटखा आणि पान मसाला विक्रीला यापुढे अजिबात थारा देणार नाही. गुटखा विक्रीबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी थेट या विभागाशी संपर्क साधावा. आता हॉटेल्स, बेकऱ्या आणि स्ट्रीटफुडधारकांची तपासणी सुरू केली आहे. अस्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व्यवसायिकांवर आमचे लक्ष आहे. वर्तमानपत्राच्या कागदावर अन्न पदार्थ देण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन होताना दिसते. यापुढे संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे श्री.गायकवाड यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!