माणगाव येथील संदेश केसरकर यांचे निधन

माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे मालक आणि माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ‘संदेश भाई’ या नावाने संपूर्ण माणगाव खोऱ्यात परिचित असलेल्या त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेली साडेचार वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला संसार उभा केला होता. कष्टाळू शेतकरी आणि मनमिळाऊ हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. इतरांच्या अडचणींना धावून जाणारा स्वभाव आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी माणगाव पंचक्रोशीत मोठा मित्रपरिवार जोडला होता.
माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या संदेश केसरकर यांनी नोव्हेंबर २००३ मध्ये माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. राजकीय क्षेत्रात कार्यरत असूनही सर्वांशी सलोख्याचे संबंध जपल्याने त्यांची अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता माणगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण व अन्य नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने माणगाव खोऱ्याने एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि जिवाभावाचा माणूस गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.






