पिंगुळी पाझर तलाव बचावासाठीचे उपोषण पाचव्या दिवशी मागे

पिंगुळी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य

पिंगुळीच्या एकजुटीचा विजय ; कारीट फोडून, पोहे वाटून आनंद साजरा

पिंगुळी गावाची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी तसेच देऊळवाडी येथील सर्वे क्रमांक २८/१ व २८/२ मधील २७५ भूखंडांच्या लेआउटला दिलेली अंतिम रेखांकन परवानगी रद्द करणे आणि इतर मागण्यांसाठी जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेतले. ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून तसे पत्र प्रभारी प्रांत अधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना दिले. पाटील यांच्या हस्ते सडवेलकर यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी सडवेलकर यांनी प्रशासन, ग्रामस्थ, सर्व लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, पत्रकार आणि या उपोषणाला सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. पण त्याचवेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल खंत व्यक्त केली.
पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या बंगलो प्रकल्पामुळे पाझर तलावाला धोका निर्माण होऊन, सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने आणि तलावाकडे जाणाऱ्या वाटा विकासकाने बंद केल्याने पिंगुळी ग्रामस्थ आपल्या विविध मागण्यांसाठी कुडाळ उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू होते.
या संदर्भात प्रशासनाशी उपोषणकर्त्यांनी चर्चा केली. आपल्या मागण्या वेळोवेळी प्रशासनासमोर ठेवल्या. .त्यानंतर प्रशासनाने तसे पत्र उपोषण कर्त्यांना दिले. त्या पत्रात म्हटले आहे, वरील विषयांकित प्रकरणी आपण मांडलेल्या मुदयांच्या अनुषंगाने तसेच उपस्थित उपोषणकर्त्यांशी प्रशासनाने केलेल्या चर्चेनुसार उपस्थित मुद्दयांच्या अनुषंगाने पुढील उचित कार्यवाहीसाठी संदर्भ क्र. ४ चे पत्रान्वये अॅक्झोन ओरिजीन कुडाळ, एल.एल.पी. करीता अधिकृत प्रतिनिधी, देऊळवाडी, पिंगुळी, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांना खालीलप्रमाणे सूचना देणेत आलेले आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते शेतकऱ्यांना वापरणेस अटकाव करु नये, तसे असल्यास सदर रस्ते तात्काळ खुले करुन देणेत यावेत. पाझर तलावातील पाणी ग्रामस्थांच्या पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने, ते कोणत्याही प्रकारे प्रदुषित होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेणेत यावी. याच अनुषंगाने लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यास कोणतीही बाधा पोचणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. उक्त मिळकतीमध्ये सुरु असलेली बांधकामे उपरोक्त नमूद मुद्दयांच्या अनुषंगाने उचित कार्यवाही होईपर्यंत स्थगित ठेवणेत यावीत. असे पत्रात म्हटले आहे.
हे पत्र प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना दिले. त्यानंतर पाटील यांनी सडवेलकर यांना सरबत प्यायला देऊन त्यांचे उपोषण सोडले. त्यावेळी ग्रामस्थांनी पिंगुळी एकजुटीचा जयजयकार केला. तसेच कारीट फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना गंगाराम सडवेलकर यांनी सर्वांचे आभार मानले. ग्रामस्थ, प्रशासन, पर्यावरणप्रेमी, पत्रकार यासर्वांच्या सहकार्यामुळे हा लढा यशस्वी झाल्याची भावना सडवेलकर यांनी व्यक्त केली. पण आमदार नीलेश राणे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपीची खंत राहील असे ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, सचिन पाटील, संजय वेतुरेकर, हेमंत देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धीरज परब, अभ्या शिरसाट, विजय प्रभू आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!