मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा परवडणार का?

दयानंद चौधरी यांचा सवाल

नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठीच १५०० ते २००० रुपये खर्च

गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने सिंधुदुर्गवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, ही सेवा नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार असल्याने मुंबईतील प्रवाशांना विमानतळ गाठण्यासाठी करावा लागणारा अतिरिक्त खर्च आणि विमानाच्या वेळेची गैरसोय लक्षात घेता, ही सेवा सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी ठरणार का, असा सवाल प्रगत सिंधुदुर्ग मुंबईचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्याबद्दल चौधरी यांनी आभार व्यक्त केले आहेत. यापूर्वी ही सेवा मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावरून सुरू होती. मात्र, आता फ्लाय ९१ कंपनीमार्फत नवी मुंबई विमानतळावरून ही सेवा सुरू होत आहे. विमानाची वेळ सकाळी ७.५५ वाजताची असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने ओला किंवा उबेरसारख्या खासगी वाहनांसाठी प्रवाशांना सुमारे १,५०० ते २,००० रुपये खर्च करावे लागतील. सकाळी ७.५५ वाजताचे विमान पकडण्यासाठी बोर्डिंग आणि सुरक्षा तपासणीच्या प्रक्रियेसाठी दीड ते दोन तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना पहाटे चार ते साडेचार वाजताच घर सोडावे लागणार आहे. ही गैरसोय लक्षात घेता मुंबईतील प्रवासी या विमानसेवेला कितपत प्रतिसाद देतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, यापूर्वी केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत काही विमान तिकिटांचे दर सुमारे २,३०० रुपये होते. मात्र, नव्याने सुरू होणाऱ्या सेवेला ही योजना लागू आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ही योजना लागू नसल्यास तिकिटाचे दर अंदाजे ३,८०० ते ४,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्यात मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा १,५०० रुपयांचा खर्च धरल्यास एका प्रवाशाला एकेरी प्रवासासाठी किमान पाच हजार रुपये मोजावे लागतील. हा खर्च सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा आहे का, असा सवाल चौधरी यांनी केला आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा अधिकाधिक प्रवाशांसाठी सोयीची आणि परवडणारी व्हावी, यासाठी विमान कंपनीने मुंबईतील सांताक्रूझ विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मोफत बससेवेची व्यवस्था करावी, अशी मागणी दयानंद चौधरी यांनी केली आहे.

error: Content is protected !!