पिंगुळी पाझर तलावाच्या बांधकामाचा प्रश्न विधानसभा आणि एनजीटीत मांडणार – जयंत पाटील

महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

तलावाची प्रत्यक्ष पाहणी करत बांधकामावर घेतला आक्षेप

पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या काठावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामाची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलावाच्या २०० मीटर परिसरात बांधकामाला परवानगी नसताना अवघ्या ५० ते ७० मीटर अंतरावर बंगल्यांचा प्रकल्प उभारला जात असल्याचा आक्षेप त्यांनी यावेळी घेतला. या प्रकरणात स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करत हा विषय विधानसभेत तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१९७२ च्या दुष्काळाच्या काळात बांधण्यात आलेल्या या पाझर तलावातून पिंगुळी गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील सुमारे २० हजार लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर सुरू असलेल्या बांधकामामुळे भविष्यात गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर तलावाचे अस्तित्व आणि जलस्रोत वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, तलावाच्या परिसरात बांधकाम करण्यास निर्बंध असताना येथे बंगल्यांचा प्रकल्प उभारला जात आहे. संबंधित कंपनीकडून तलावालगत बंगल्यांची जाहिरातही करण्यात आली आहे. या बंगल्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी तलावात सोडले जाण्याची शक्यता असून त्यामुळे जलस्रोत दूषित होण्याबरोबरच पर्यावरणाचीही हानी होऊ शकते. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी बोलावल्यामुळे आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
सासोलीनंतर आता पिंगुळी येथेही तलावांच्या परिसरातील बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या या तलावाचे संरक्षण होणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत हा जलस्रोत खासगी प्रकल्पाच्या विळख्यात जाऊ देणार नाही, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिलणकर, राजन नाईक, अभय शिरसाट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!