कणकवलीत ५७ लाखांची ॲल्युमिनियम केबल चोरी उघड

राजस्थान, हरियाणातील तिघे ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

कणकवली तालुक्यातील ओसरगाव-गवळवाडी येथे तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबलची चोरी झाल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ओसरगाव, गवळवाडी येथे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली होती. यामध्ये पॅकिंगसह ॲल्युमिनियम लाईट केबलचे एकूण पाच बंडल चोरीला गेले होते. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चोरीचा छडा लावला.
या कारवाईत इरशाद खुर्शीद खान (वय ३२, रा. हमिर्राका, ता. तिजारा, जि. अलवर, राजस्थान), आरिफ खुर्शीद खान (वय ३०, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) आणि शाहीद खुर्शीद खान (वय २४, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) या तिघांना ५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली पाचही केबल बंडले तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर तिघांनाही पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.

error: Content is protected !!