स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन
‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल मांडणारी आहे,’ असे मत सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित 'निखळत्या चौकटीत' कादंबरीवरील परिसंवादन मान्यवरांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील गुणवान लेखकांना पुढे घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानतर्फे अंजली ढमाळ यांच्या ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर पुणे एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात ज्येष्ठ समीक्षक डॉ.रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. समीक्षक डॉ.दत्ता घोलप स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ.गीताली वि.म. प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या या मंचावर लेखिका अंजली ढमाळ समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रतिष्ठांच्या पदाधिकारी डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले त्याच बरोबर ज्येष्ठ अनुवादक डॉ. दामोदर खडसे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर जीएसटी कमिशनर वैशाली पतंगे, ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद कुळे, ज्येष्ठ साहित्यिक अंजली कुलकर्णी, इंदुमती जोंधळे, कवी प्रवीण अक्कनवरु, अभिनेते आशुतोष घोरपडे, कवयित्री योजना यादव, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे, कवी व लेखक श्रीरंजन आवटे, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गिरिजा गोडबोले, मेधा ताडपत्रीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री संगीता बर्वे, कादंबरीकार बबन मिंडे, सुशील धसकटे, फिल्ममेकर तथा छायाचित्रकार संदेश भंडारे, कथालेखिका सुचिता घोरपडे, संशोधक डॉ. निर्मोही फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दत्ता घोलप यांनी ही कादंबरी कठोर पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघड करणारी असून, समांतरपणे अनेक स्त्रियांच्या जगण्याचा अवकाश पकडण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांनी कादंबरीच्या अनुषंगाने कुटुंब व्यवस्थेतील ताणेबाणे आणि पुरुषांची कुचंबणा यावर सखोल मांडणी केली.अध्यक्षीय भाषणात डॉ. रेखा इनामदार-साने यांनी लेखिकेच्या भाषेचे आणि आशयाचे कौतुक केले. ‘कादंबरीतील पात्रे काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवलेली नसून, ती स्खलनशील माणसे आहेत हे दाखवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे,’ असे त्या म्हणाल्या.आपली भूमिका मांडताना लेखिका अंजली ढमाळ म्हणाल्या, ‘व्यक्ती आणि समष्टीचा विचार वेगळा करता येत नाही. स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतील गुंते सुटावेत आणि माणूसपणाच्या मूल्यांकडे जाण्याचे बळ मिळावे, हाच या लेखनाचा उद्देश आहे.’ प्रास्ताविक अजय कांडर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ.प्रिया निघोजकर यांनी केले. डॉ. योगिता राजकर यांनी आभार मानले. मनीषा शिरटावले यांनी स्वागत केले.





