एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांसोबत रंगला बुद्धिबळाचा डाव !

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. शरद वझे यांचा अनोखा ‘सायमलटेनियस चेस प्ले’

११ हजारांहून अधिक खेळाडूंशी खेळण्याचा विक्रम

एकाच वेळी शेकडो बुद्धिबळपटांवर सुरू असलेले डाव, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या चालीवर बारीक लक्ष आणि पुढील खेळीचा अचूक अंदाज अशा बुद्धिबळाच्या अनोख्या थराराचा अनुभव बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी घेतला. ज्येष्ठ बुद्धिबळपटू तथा चॅलेंजर चेस अकॅडमी, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद वझे यांनी विद्यार्थ्यांसोबत एकाच वेळी बुद्धिबळाचे डाव खेळत त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हान दिले. दीपावलीनिमित्त संस्थेच्या वतीने आयोजित कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ३ नोव्हेंबर रोजी हा विशेष कार्यक्रम झाला.
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मार्गदर्शनपर कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. शरद वझे यांच्यासह ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे, बॅ. नाथ पै रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरुण मर्गज, फिजिओथेरपीच्या प्रा. वैष्णवी नाईक, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशाली ओटवणेकर, उपमुख्याध्यापिका चित्रा कुंटे, प्रिती म्हाडदळकर आदी उपस्थित होते.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात डॉ. वझे यांनी एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळाचे सामने खेळले. ‘सायमलटेनियस चेस प्ले’ या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारात एका खेळाडूने एकाच वेळी अनेक पटांवर प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जायचे असते. प्रत्येक पटावरील खेळी लक्षात ठेवत प्रतिस्पर्ध्याच्या चालींना प्रत्युत्तर देण्याचे कसब डॉ. वझे यांनी आपल्या वेगवान खेळीतून दाखवून दिले. बुद्धिबळाचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांच्यातील बौद्धिक क्षमता विकसित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
विश्वनाथन आनंद यांनी २००७ मध्ये बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर या खेळाच्या प्रसारासाठी डॉ. शरद वझे यांनी १ मे २००८ पासून ‘बुद्धिबळ प्रज्ञा शोध’ हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत बुद्धिबळाचे सामने खेळले आहेत. आतापर्यंत नऊ राज्यांमधील विविध संस्थांतील ११ हजारांहून अधिक खेळाडूंशी त्यांनी अशा प्रकारचे सामने खेळल्याची नोंद आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुपरफास्ट बुद्धिबळ खेळण्याचा वेग. एका तासात सुमारे २० खेळाडूंसोबत सामने खेळत सलग अनेक तास शेकडो खेळाडूंना ते आव्हान देतात. प्रत्येक पटावरील डावाचे आकलन, प्रतिस्पर्ध्याच्या पुढील चालीचा अंदाज आणि त्याचवेळी खेळाचे समालोचन करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बुद्धिबळातील डावपेच, रणनीती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. सायंकाळपर्यंत संस्थेच्या सभागृहात हा उपक्रम सुरू होता. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य प्रत्यूश रंजन बिस्वाल, जयराज चौहान, संदीप पवार, पालक प्रतिनिधी नितीनकुमार आचार्य, शिक्षक प्रतिनिधी विश्वजीत डांगमोडेकर यांच्यासह शिक्षकवृंद आणि पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संस्थेच्या वतीने आयोजित या अभिनव उपक्रमाचे डॉ. शरद वझे तसेच पालकांनी भरभरून कौतुक केले.

error: Content is protected !!