CPR प्रशिक्षणातून ५५० जण सक्षम

रोटरी क्लब, पंचायत समिती, राणे हॉस्पिटल आणि USV फार्माचा संयुक्त पुढाकार

हृदयविकाराचा झटका किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी CPR (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारे जनजागृती व प्रशिक्षण शिबिर कुडाळ येथे उत्साहात संपन्न झाले. रोटरी क्लब ऑफ कुडाळ, पंचायत समिती कुडाळ, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि USV Pharma Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ५५० हून अधिक जणांनी सहभाग घेत CPR चे प्रशिक्षण घेतले.
या शिबिरामध्ये उपस्थितांना CPR चे महत्त्व, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच CPR देण्याची योग्य पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना CPR करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, पंचायत समितीचे सर्व सदस्य, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, माजी अध्यक्ष राजीव पवार, डिस्ट्रिक्ट क्लब कोऑर्डिनेटर प्रणय तेली, राजन बोबाटे, डॉ. संजय सावंत, नीता गोवेकर, राणे हॉस्पिटलचे डॉ. जी. टी. राणे, USV Pharma चे क्रांतिकुमार नागवेकर, डॉ. निशा धुरी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
यावेळी सभापती मिलिंद नाईक आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात समाजासाठी हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा अनमोल जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या धावपळीच्या जीवनात अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय संकटांचा सामना करण्यासाठी सामान्य नागरिकांनाही CPR चे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ५५० हून अधिक नागरिकांना देण्यात आलेले हे प्रशिक्षण समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वेळीच मिळालेली मदत आणि CPR चे योग्य ज्ञान एखाद्याला नवजीवन देऊ शकते, याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

error: Content is protected !!