केळुसच्या आकाश फिश मिलविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

अतुल बंगे यांची माहिती
दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिक त्रस्त
केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर गळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या प्रकारामुळे म्हापण, पाट, हुमरमळा आणि माड्याचीवाडी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिली.
केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीबाबत यापूर्वीही विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची ये-जा वाढली आहे. या गाड्यांमधून मच्छीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने संपूर्ण मार्गावर दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, रोगराई पसरण्याचा धोका असल्याचे अतुल बंगे यांनी सांगितले.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे बंगे यांनी स्पष्ट केले.






